गाजराचे मोदक : गाजराचे मोदक ही एक स्वीट डीश आहे. मोदक म्हंटले की महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय डीश आहे. आपण नेहमीच नारळाचे मोदक करतो. गाजराचे मोदक हे चवीला छान लागतात. आपण हे गणपतीच्या आरती नंतर प्रसाद म्हणून देवू शकतो. गाजर हे पौस्टिक आहे. ते फळ म्हणून व भाजी म्हणून सुद्धा वापरता येते. गाजर हे शक्तीवर्धक आहे. आपण गाजर हलवा बनवतो त्याचेच मोदक बनवून पहा तांदुळाचे उकडीचे मोदक व गाजर हलवा हे कॉमबीनेशन खूप छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ७ मोदक
साहित्य :
सारणासाठी
२५० ग्राम केशरी गाजरे
१/२ कप दुध
१/४ कप साखर
१/४ टी स्पून वेलचीपूड
थोडा सुकामेवा
आवरणासाठी
१ कप तांदळाचे पीठ
१ कप पाणी
१ टी स्पून मैदा
१ टी स्पून तूप
मीठ चवीने
कृती : सारणासाठी : गाजरे स्वच्छ धुवून सोलून किसून घ्यावीत. एका कढई मध्ये किसलेले गाजर, दुध व साखर मिक्स करून आटवून घ्या. नंतर त्यामध्ये वेलची पूड व सुकामेवाचे तुकडे घालून मिश्रण तयार करा.
आवरणासाठी : एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये मीठ व तेल घालून, पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा मिक्स करून हलवून भांड्यावर झाकण ठेवा व दोन मिनिट त्याला वाफ येवू द्या.
नंतर शिजलेले पीठ परातीत काढून घेवून ओल्या हाताने चांगले मळून घ्या. मग त्याचे लिंबा एव्ह्डे गोळे करून हातावर पुरी सारखे थापून त्यामध्ये एक चमचा मिश्रण ठेवून पुरी बंद करा व त्याला मोदकाचा आकार द्या. असे सर्व मोदक तयार करून घ्या.
मोदक पात्रात पाणी गरम करून घ्या. मोदक पात्राच्या चाळणीवर एक केळीचे पान ठेवून त्यावर पाणी शिंपडून सर्व मोदक लावून घ्या. परत मोडका वरती एक केळीचे पान ठेवून मोदक पात्राचे झाकण घट्ट लावून १५ मिनिट मोदक उकडून घ्या.
गरम गरम मोदक वरतून साजूक तूप घालून सर्व्ह करा.
टीप : गाजराचा हलवा बनवताना गाजरे फार जून घेवू नका. दुधामध्ये हलवा बनवला तर खवा घालायची गरज नाही.
तांदळाचे पीठ जुने नसावे. नाहीतर मोदक चांगले होणार नाहीत.
मोदक पात्र नसेल तर मोठे भांडे घेवून त्यामध्ये पाणी घालून त्यावर चाळणी ठेवावी व त्यावर केळीचे पाने ठेवून मोदक ठेवून घट्ट झाकण ठेवून झाकणावर थोडे वजन ठेवावे म्हणजे वाफ जाणार नाही.
मोदक झाल्यावर मोदक ओल्या हातांनी काढावे म्हणजे तुटणार नाहीत.
The English version of the Carrot Modak recipe is published in the article – Here