तांबडा – लाल भोपळ्याची भाजी – Red Bhopla Bhaji Maharashtrian Style : तांबडा भोपळा दिसायला पण सुंदर दिसतो व तो पौस्टिक पण आहे. महाराष्ट्रात तांबडा भोपळा हा जास्त प्रमाणात वापरला जातो त्याच्या पासून भाजी, भरीत, पुऱ्या केल्या जातात व त्या खूप छान लागतात.. ह्याचा औषधी गुणधर्म असा आहे की हा भोपळा आपल्या प्रकृती साठी थंड आहे. त्याच्या सेवनाने रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्याचा रस घेतल्याने त्याने रात्री झोप पण चांगली लागते. पण हा रस ताजा घ्यावा. हा भोपळा पिक्तशामक आहे. ज्याची प्रकृती नाजूक आहे त्याच्या साठी भोपळा अगदी आरोग्य कारक आहे.
साहित्य : २५० ग्राम तांबडा भोपळा, १ छोटा कांदा, २ हिरव्या मिरच्या, १ टे स्पून शेंगदाणे कुट, १ टी स्पून गुळ, १ टे कोथंबीर, १ टे स्पून नारळ (खोवून), मीठ चवीने
फोडणी साठी : १ टे स्पून तेल, १ टी स्पून मोहरी, १ टी स्पून जिरे, १/४ टी स्पून मेथी दाणे, १/४ टी स्पून हिंग, १/४ टी स्पून हळद
कृती : भोपळ्याच्या बिया काढून त्याची साले काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत व पाण्यात घालून चाळणीवर ठेवावेत.
कढई मध्ये तेल गरम करून फोडणी करून घ्यावी व त्यामध्ये भोपळ्याचे तुकडे घालून मिक्स करून झाकण ठेवावे व झाकणावर थोडे पाणी ठेवावे. ह्या भाजीमध्ये पाणी घालू नये भाजीच्याच पाण्यामध्ये शिजवावे. ही भाजी लवकर शिजते. भाजी शिजल्यावर थोडा गुळ घालून भाजी मिक्स करावी व १-२ मिनिट मंद विस्तवावरच ठेवावी. नंतर त्यामध्ये शेंगदाणे कुट, कोथंबीर व नारळ घालून मिक्स करावे.
गरम गरम चपाती बरोबर ही भाजी सर्व्ह करावी.