भरलेली अंडी- Stuffed Eggs : भरलेला अंडी हा एक स्टार्टर पदार्थ करता येईल किंवा तोंडी लावायला सुद्धा करता येईल. ही डीश चवीला खूप छान लागते व दिसायला पण सुंदर दिसते. ह्या मध्ये उकडलेल्या पूर्ण अंड्यावर बटाट्याचे आवरण आहे त्यामुळे डीश तयार झाल्यावर मधून कट केले असता दिसायला खूप छान दिसते.
साहित्य :
आवरणासाठी : ३ मध्यम बटाटे (उकडून)
२ हिरव्या मिरच्या
१/२” आले तुकडा
१ टे स्पून कोथंबीर (बारीक चिरून)
१ टे स्पून पुदिना (बारीक चिरून)
मीठ चवीने
१/४ टी स्पून लिंबू रस
भरण्यासाठी : ३ अंडी (उकडून)
वरतून आवरणासाठी : २ टे स्पून मैदा
मीठ व मिरे पावडर चवीने
सजावटीसाठी : पुदिना पाने, मिरे पावडर
तेल तळण्यासाठी
कृती :
बटाटे उकडून सोलून घ्या. थंड झाल्यावर किसून घ्या. मग त्यामध्ये हिरवी मिरची व आले वाटून घाला, कोथंबीर, पुदिना, मीठ व लिंबू घालून चांगले मिक्स करून घेवून त्याचे तीन भाग करा.
अंडी उकडून सोलून बाजूला ठेवा.
एक एक अंडे घेवून त्यावर बटाट्याच्या मिश्रणाचे आवरण एक सारखे लावून घ्या, असे तीनही अंड्याला आवरण लावा.
मैदा, मीठ, मिरे पावडर व थोडे पाणी घालून भज्याच्या पीठा सारखे भिजवून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यावर एक एक आवरण लावलेले अंडे घेवून मैद्याच्या मिश्रणात घोळून गरम तेलामध्ये गुलाबी रंगावर तळून घ्या.
सर्व्ह करताना अंडे मधे कापून त्यावर मिरी पावडर पुदिना पानांनी सजवून मग सर्व्ह करा.