सुधारस : सुधारस ही एक स्वीट डीश आहे. सुधारस ही डीश महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. सुधारस हा लिंबू पासून तयार करतात. लिंबानी छान चव पण येते. सुधारस हा चपाती बरोबर खायला छान लागतो. लहान मुलांना तर सुधारस खूप आवडतो. एखाद वेळेस भाजी नसेल तर चपाती बरोबर सर्व्ह करता येतो. ह्याची चव छान आंबटगोड अशी आहे. केशर घातल्याने त्याला रंगपण छान येतो, व सुगंध पण छान येतो. जर आजारी माणसाला तोंडाला चव नसेल तेव्हा चपाती बरोबर सर्व्ह करावे.
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ८ जणासाठी
साहित्य :
१२ ताजी पिवळी लिंबे
१ किलो साखर
७-८ काड्या केसर किंवा केसरी रंग
१०-१२ बेदाणे
१०-१२ बदाम
५-६ वेलदोडे
कृती :
बदाम पाण्यात भिजत घालून नंतर त्याची साले काढावीत. व त्याचे लांबट तुकडे करावेत. बेदाण्याच्या काड्या काढाव्यात व बेदाणे पुसून घ्यावेत. वेलदोड्याची पूड करून घ्यावी.
लिंबे धुवून पुसून कोरडी करावी. व हाताने थोडी मऊ करून घ्यावीत. लिंबाचा रस काढून घ्या. पण रस काढतांना काळजी घ्याकी लिंबाचा कडवट पणा लिंबाच्या रसात जाणार नाही.
एका जाडबुडाच्या पातेल्यात साखर घेवून साखर बुडेल इतपत पाणी घाला व मंद विस्तवावर भांडे ठेवा. पाक थोडा घट्ट झाला पाहिजे. पाक झाल्यावर त्यामध्ये लिंबाचा रस घालून एक उकळी आणावी.
नंतर सुधारसात केसर अथवा केसरी रंग, बदामाचे काप, बेदाणे व वेलची पूड घालून चांगले मिक्स करावे. थंड झाल्यावर काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवावे.
वाढतांना जर सुधारस घट्ट वाटला तर थोडेसे गरम पाणी घालावे. पण खूप घालू नये. नाहीतर सगळी टेस्ट जाईल.
टीप : ह्या रसामध्ये आपण अननसाच्या फोडी किंवा आंब्याच्या फोडी घालता येतात. त्याने सुद्धा सुंदर चव येते.