भरलेली मसाला वांगी : भरलेली मसाला वांगी ही भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीची आहे. ही भाजी थोडी रश्याची आहे त्यामुळे चपाती व भाता बरोबर पण चालू शकते. वांगी पाणी न घालता परतल्यामुळे खमंग लागतात.
साहित्य :
२५० ग्राम काटेरी बीन बियांची छोटी वांगी
मसाला साठी :
२ मोठे कांदे
१ कप नारळ खोवलेला
१/४ कप शेंगदाणे कुट
१/२ कप कोथंबीर
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१/४ टी स्पून हिंग
मीठ चवीने
कृती : वांगीचे देठ काढून मधून उभ्या चिरा द्याव्यात व पाण्यात घालून ठेवावी. कांदे बारीक चिरून घावे. तीळ व खोबरे भाजून त्याची पूड करावी.
कांदे, तीळ-खोबऱ्याची पूड, शेंगदाणे कुट, कोथंबीर, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ व एक चमचा तेल घालून मिक्स करून घ्यावे. मग चिरलेल्या वांग्यामध्ये भरावे. त्यातील थोडासा मसाला बाजूला काढून ठेवावा.
एका कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, हिंग घालून मसाला भरलेली वांगी व बाजूला ठेवलेला मसाला घालून झाकण ठेवून झाकणावर पाणी घालून मंद विस्तवावर वांगी शिजवून घ्यावीत.
वांगी शिजल्यावर त्यामध्ये जसा रस्सा पाहिजे तसे थोडे पाणी घालावे व एक उकळी आणावी.
गरम गरम चपाती बरोबर सर्व्ह करावी.