केळफुलाची भाजी – Flower of the Banana : केळफुलाची भाजी चवीला खूप छान लागते. ही भाजी महाराष्ट्रातील कोकण ह्या भागामध्ये बनवली जाते. केळफुलाची भाजी बनवतांना हरबरे किंवा वाटाणे घातले आहेत त्यामुळे त्याची चव पण छान लागते. ह्यामध्ये मसाला वापरला नाही तर फक्त कांदा, आले-लसूण व हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे ही भाजी छान बिन मसाल्याची आहे. केळफुलाची भाजी गरम गरम चपाती अथवा भाकरी बरोबर चांगली लागते.
केळफुलाची भाजी साफ करण्यासाठी: ४५ मिनिट
केळफुलाची भाजी बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
१ केळफूल (मध्यम आकाराचे)
२ मोठे कांदे
२-३ हिरव्या मिरच्या
१” आले तुकडा
१/४ कप वाटाणे अथवा हरबरे (भिजवून थोडे शिजवून)
१/४ कप नारळ (खोवून)
मीठ चवीने
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हिंग
कृती :
ज्या दिवशी भाजी करायची त्याच्या आदल्यादिवशी केळफूल सोलून बारीक चिरून पाण्यात घालून ठेवावे. दुसऱ्या दिवशी पाणी पिळून काढून टाकावे. कांदा बारीक चिरून घ्यावा.
एका कढई मध्ये तेल गरम करून हिंग घालून मग हिरवी मिरचीचे तुकडे घालून कांदा घालावा. कांदा थोडा परतून घ्यावा. मग चिरलेले केळफूल घालावे. आले ठेचून घालावे. वाफेवर भाजी शिजू द्यावी. मग त्यामध्ये वाटाणे, ओला नारळ, मीठ घालून परतून घ्यावी.
गरम गरम भाजी चपाती किंवा भाकरी बरोबर छान लागते.