तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळे Rice Flour Shankarpali: तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळे ह्या चटपटीत लागणाऱ्या शंकरपाळ्या आहेत. ह्या आपण संध्याकाळी चहा बरोबर नाश्त्याला करू शकतो. ह्या बनवायला अगदी सोप्या व लवकर होणाऱ्या आहेत. ह्या छान तिखट व कुरकुरीत लागतात. लहान मुलांना खूप आवडतील. ह्या शंकरपाळ्या आपण दिवाळीच्या फराळासाठी सुद्धा बनवू शकतो. गोड पदार्थांच्या बरोबर ह्या शंकरपाळ्या खूप चवीस्ट लागतात.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १ १/४ किलो बनतात
साहित्य :
१ किलो ग्राम तांदळाचे पीठ
१/४ किलो ग्राम बेसन (हरभरा डाळ पीठ)
१ टे स्पून तेल (गरम मोहन)
७-८ हिरव्या मिरच्या
१ टी जिरे
१/२ टी स्पून हळद
एक चिमुट खायचा सोडा
मीठ चवीने (पण थोडे जास्त)
तेल तळण्यासाठी
कृती : प्रथम हिरव्या मिरच्या वाटून घ्या. जिरे थोडे जाडसर कुटून घ्या. तांदळाचे पीठ, बेसन, मीठ, खायचा सोडा,हळद मिक्स करून घ्या.
मिक्स केलेल्या तांदळाच्या पिठात वाटलेल्या मिरच्या, कुटलेले जिरे, व गरम कडकडीत तेलाचे मोहन घालून मिक्स करून पाणी घालून पीठ घट्ट मळून घ्या. १० मिनिट पीठ तसेच ठेवावे. मग त्याचे एक सारखे गोळे बनवून घ्या. एक एक गोळा लाटून त्याच्या शंकरपाळ्या कापून घ्या.
कढईत तेल गरम करून शंकरपाळ्या गुलाबी रंगावर तळून घ्या. ह्या शंकरपाळ्या ८-१० दिवस चांगल्या रहातात.