खमंग चिवडा भाजके पोहे : दिवाळी फराळ म्हटले की लाडू, कारंजी, चकली, शंकरपाळे असतात पण चिवडा तर हा हवाच. आपण पातळ पोह्याचा चिवडा, दगडी पोह्याचा चिवडा, मुरमुरे चिवडा, मक्याचा चिवडा बनवतो. महाराष्ट्रीयन लोकांचा हा आवडता चिवडा आहे. भाजक्या पोह्याचा चिवडा तर खूप चवीस्ट लागतो. हा चिवडा चमचमीत छान लागतो. भाजके पोहे हे भट्टीत भाजलेले असतात. भाजक्या पोह्याच्या चिवड्यात आले, लसूण, हिरवी मिरची व कसुरी मेथी घातली तर त्याची चव निराळीच लागते. त्यामुळे चिवडा खमंग लागतो.
The English language version of this Poha Chivda recipe and preparation method can be seen here – Spicy Chivda for Diwali Faral
खमंग चिवडा भाजके पोहे बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १/२ किलो ग्राम चिवडा बनतो
साहित्य :
१/४ किलो ग्राम (२५० ग्राम) भाजके पोहे
२ कप शेंगदाणे
२ १/२ कप सुके खोबरे पातळ काप
१ १/२ कप पंढरपुरी डाळ
१ टे स्पून पिठीसाखर
फोडणी साठी :
१ १/२ कप तेल
१ टे स्पून मोहरी
१ टे स्पून जिरे
२०-२५ कडीपत्ता पाने
१” आले तुकडा
१२ लसूण पाकळ्या
१० हिरव्या मिरच्या
१ टे स्पून धने-जिरे पावडर
१ टी स्पून हळद
१ टे स्पून लाल मिरची पावडर
१ टे स्पून कसुरी मेथी (सुकलेली)
कृती : प्रथम भाजके पोहे निवडून चाळून घ्या. आले-लसूण-हिरवी मिरची ठेचून बारीक करून घ्या. खोबऱ्याचे पातळ काप करून घ्या.
मोठ्या कढई मध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, आले-लसून-हिरवी मिरची, कसुरी मेथी, कडीपत्ता पाने घालून थोडेसे परतून घ्या मग धने-जिरे पावडर घालून शेंगदाणे घालून खमंग परतून घेवून खोबऱ्याचे काप घालून गुलाबी रंगावर मंद विस्तवावर परता.
मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, फुटाणा डाळ, मीठ घालून लगेच भाजके घालावेत व मिक्स करून पिठीसाखर साखर घालून चिवडा चांगला ढवळावा.
थंड झाल्यावर मगच डब्यात भरावा.