पनीर-खवा लाडू (Paneer-Khoya Lad00/Laddu) : पनीर-खवा लाडू हे दिवाळी फराळासाठी बनवता येतील. हे लाडू बनवतांना होममेड पनीर वापरले आहे. खवा व नारळ वापरल्यामुळे हे अगदी चवीस्ट लागतात तसेच ह्यामध्ये थोडे आटवलेले दुध घातले आहे. त्यामुळे लाडूची चव अप्रतीम येते. पनीर-खवा लाडू हे आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो.
पनीर-खवा लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २२ लाडू बनतात
साहित्य :
१ कप पनीर (घरी बनवलेले)
१ कप खवा [Khoya]
१ कप आटवलेले दुध (थोडेसे घट्ट)
१/४ कप दुध
२ कप नारळ (खोवलेला)
२ १/२ कप साखर
१ टी स्पून वेलचीपूड .
सजावटीसाठी ड्रायफ्रुट व केसर च्या काड्या
कृती : पनीर घरी कसे बनवायचे.
साहित्य :पनीर साठी :
१ लिटर गाईचे दुध
१/४ टी स्पून सायट्रिक असिड
कृती : दुध तापवून घ्या. सायट्रिक असिड पाण्यात विरघळून घ्या. दुध परत तापवत ठेवा व त्यामध्ये सायट्रिक असिडचे पाणी घालून एक मिनिट हलवत रहा. दुध फाटले की विस्तव बंद करा. एका चाळणीवरती कपडा घालून फाटलेले दुध कापडावर ओता मग थंड पाणी त्यावर ओता. घट्ट पिळून पाणी काढा. पनीर तयार झाले. मग पनीर एकदा मिक्सरमध्ये काढा.
नंतर खोवलेला नारळ, आटवलेले दुध, साधे दुध मिक्स करून मंद विस्तवावर ८-१० मिनिट शिजत ठेवा. मग त्यामध्ये पनीर, खावा व साखर घालून परत आटवत ठेवा, चांगले घट्ट होई परंत आटवून घ्या. मग त्यामध्ये वेलचीपूड घालून मिक्स करा. मिश्रण इतके घट्ट झाले पाहिजे की त्याचे लाडू वळवता आले पाहिजेत. त्याचे लाडू वळून वरतून ड्रायफ्रुट व केसर घालून सजवा.