चिवडा पातळ पोह्याचा: पातळ पोह्याचा चिवडा महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे. दिवाळी फराळ म्हंटल की चिवडा, लाडू, शेव, चकली व करंजी आलेच. चिवड्याचे पण काही वेगवेगळे प्रकार आहेत. पातळ पोह्याचा चिवडा, भाजक्या पोह्याचा चिवडा, मक्याच्या पोह्याच्या चिवडा, चुरमुरे चिवडा, वगैरे. पातळ पोह्याचा चिवडा हा एक प्रकार आहे. पातळ पोहे चिवडा बनवण्यासाठी सोपा आहे व कमी वेळात बनवू शकतो. हा चिवडा बनवतांना थोडे चुरमुरे वापरले आहेत त्यामुळे चिवडा दिसायला छान दिसतो व चवपण चांगली येते. तसेच चिवडा बनवतांना फोडणीत कांदा किसून घातला आहे त्यामुळे चिवड्याची चव खमंग येते. चिवडा बनवून झाल्यावर शेवटी पिठीसाखर घालून परत चिवडा परतून घेतला त्यामुळे छान कुरकुरीत होतो व पिठीसाखर वापरल्यामुळे चव चांगली लागते.
The English language version of the Patal Pohe Chivda recipe and preparation method can be seen here – Maharashtrian Patal Poha Chivda
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १ किलो चिवडा बनतो.
साहित्य:
५०० ग्राम पातळ पोहे (पोहे २ मिनिट गरम करून घ्या)
५० ग्राम मुरमुरे (चुरमुरे)
२५० ग्राम शेंगदाणे (भाजून, साले काढून)
१०० ग्राम सुके खोबरे (काप करून)
१०० ग्राम पंढरपूरी डाळ
५० ग्राम काजू
५० ग्राम मनुके
पिठीसाखर व मीठ
फोडणी करीता:
३/४ कप तेल
२ टी स्पून मोहरी
२ टी स्पून जिरे
१/४ कप कडीपत्ता
५० ग्राम हिरवी मिरची (तुकडे करून)
१ मोठा कांदा
१ टी स्पून हळद पावडर
कृती: एका मोठ्या आकाराच्या कढईमधे पोहे दोन मिनिट मंद विस्तवावर परतून घेऊन मग पेपरवर पसरवून ठेवा. शेगदाणे भाजून सोलून घ्या. हिरव्या मिरच्या चिरून घ्या. कांदा सोलून किसून घ्या. कडीपत्ता धऊन पसरवून ठेवा. सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घेऊन गुलाबी रंगावर तळून घेऊन बाजूला ठेवा. साखर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या.
एका मोठ्या कढईमधे तेल गरम करून घेऊन त्यामध्ये मोहरी, जिरे, हिरव्या मिरच्या, कडीपत्ता व कांदा घालून चांगला गुलाबी रंगावर परतून घ्या. त्यामध्ये हळद, शेगदाणे, खोबरे, काजू, पंढरपूरी डाळ, व मीठ घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये पातळ पोहे व चुरमुरे घालून मिक्स करून ५-७ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या. नंतर त्यामध्ये पिठीसाखर व किसमिस घालून मिक्स करून पोहे थोडे कुरकुरीत होईपरंत परतून घ्या.
पातळ पोहे चिवडा झाल्यावर थंड करायला तसाच ठेवा. चिवडा थंड झाल्यावर प्लास्टिक पिशवीत भरून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.