मोगलाई अंड्याचा पराठा : अंड्याचा पराठा आपण सकाळी नाश्त्याला बनवू शकतो. तसेच कोणी पाहुणे आले तर झटपट अंड्याचा पराठा बनवू शकतो त्याने पोट सुद्धा भरते व ब्रंच साठी सुद्धा बनवू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात सुद्धा देता येतो. अंडे हे पौस्टिक तर आहेच. लहान मुले अंडे खायला कंटाळा करतात त्यांना अंड्यातील पिवळे बलक आवडत नाही. पण पिवळा भागच पौस्टिक असतो. म्हणून असा पराठा बनवला तर छान होईल.
मोगलाई अंड्याचा पराठा हा बनवायला अगदी सोपा आहे तसेच कमी वेळात चांगली डीश सुद्धा होते. मी मोगलाई पराठा बनवतांना मैदा वापरला आहे. आपण निम्मा मैदा व निम्मे गव्हाचे पीठ किंवा फक्त गव्हाचे पीठ सुद्धा वापरू शकता.
मोगलाई अंड्याचा पराठा हा छान कुरकुरीत बनतो अगदी हॉटेल (रेस्टॉरंट) सारखा बनतो.
बनवण्यासाठी वेळ : २० मिनिट
वाढणी : २ जणांसाठी
साहित्य :
परोठ्याचे सारण :
२ अंडी (मोठी)
१ मध्यम आकाराचा कांदा
२ टे स्पून कोथंबीर
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१/४ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
परोठ्या साहित्य
२ कप मैदा
मीठ चवीने
१ टे स्पून तेल
२ टे स्पून तेल किंवा तूप परोठा भाजण्यासाठी
कृती :
मैदा, मीठ व तेल मिक्स करून पीठ मळून घेवून १० मिनिट बाजूला ठेवा.
कांदा, हिरवी मिरची, कोथंबीर बारीक चिरून घ्या. अंडी फोडून चांगली फेटून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथंबीर, लाल मिरची पावडर, मीठ घालून मिक्स करा.
मळलेल्या पीठाचे दोन एक सारखे गोळे बनवा. एक गोळा घेवून मोठी चपाती लाटून घ्या.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर लाटलेली चपाती घालून एका बाजूने शेकून घ्या मग उलट करून निम्मे अंड्याचे मिश्रण घालून पोळी तीन बाजूनी मुडपून घ्या. मग परोठ उलटून बाजूनी तेल अथवा तूप सोडून दोनी बाजूनी अंड्याचा पराठा खरपूस भाजून घ्या.
मोगलाई अंड्याचा पराठा गरम-गरम टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
The English language version of the Spicy Mughlai Egg Paratha is published in this – Article