घडीची पोळी अथवा घडीच्या चपात्या: घडीची पोळी अथवा घडीच्या चपात्या ह्या महाराष्ट्रातील लोकांच्या प्रसिद्ध आहेत. पंजाबमध्ये पराठे बनवतात, गुजरात मध्ये फुलके बनवतात, तसेच महाराष्ट्रात घडीच्या चपात्या बनवतात. खरम्हणजे चपाती बनवन हे कौशल्याच काम आहे. रोटी, इंडिअन ब्रेड म्हणजेच चपाती होय. चपात्या ह्या छान मऊ व लुसलुशीत बनवता आल्या पाहिजेत तेव्हाच जेवणात मज्जा येते. तसेच चपाती भाजण सुद्धा नीट जमल पाहिजे.
गव्हाच्या पिठाच्या चपात्या फार छान होतात. चपात्या बनवण्याच्या आगोदर ६० मिनिट तरी कणिक मळून ठेवावी म्हणजे चपात्या चांगल्या होतात. कणिक मळून घेतांना कणिक फार घट्ट अथवा फार सैल मळू नये नाहीतर पोळ्या चांगल्या होत नाहीत. कणिक नेहमी मध्यम मळावी. चपाती लाटताना लाटण्याने हलक्या हाताने लाटावी फार दाबून लाटू नये. पोळी लाटताना तांदळाचे पीठ वापरावे म्हणजे पोळी हलकी होते. तसेच पोळी भाजून घेतांना जाड तवा वापरावा, तवा चांगला तापल्यावर पोळी त्यावर घालावी व थोडी फुगल्यावर मग उलट करावी कडेनी शेकून घ्यावी. मग परत उलट करावी. मग चपाती खाली उतरवून त्यातील वाफ काढावी व वरतून १/२ टी स्पून साजूक तूप लावावे. चपात्या ठेवताना चपातीच्या खाली जाळीची प्लेट ठेवावी म्हणजे वाफेनी पोळी ओली होत नाही. पोळ्या शक्यतो घडी करून ठेवाव्या म्हणजे मऊ रहातात.
घडीच्या पोळ्या बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ६ पोळ्या
साहित्य:
२ कप गव्हाची कणिक
२ टे स्पून तेल
१/२ टी स्पून मीठ
१/२ कप तांदूळ पिठी
तेल व साजूक तूप चपातीला लावायला
कृती:
गव्हाच्या पीठाची कणिक कशी मलावी: एका मोठा थाळी मध्ये गव्हाचे पीठ, मीठ व एक टे स्पून तेल घालून मिक्स करून घ्यावे. मग त्यामध्ये हळूवारपणे पाणी घालत पीठ मध्यम मळावे. फार घट्ट अथवा फार सैल मळू नये. कणिक मळून झाल्यावर ६० मिनिट झाकून बाजूला ठेवावी. मग झाकण काढून तेलाच्या हाताने कणिक परत थोडी मळून घावी. कणकेचे ६-७ एक सारखे गोळे बनवावे.
मग एक गोळा घेवून पुरीच्या आकाराचा लाटून घ्यावा. मग त्यावर १/२ टी स्पून तेल व तांदळाची पिठी भुरभुरावी व अर्धी मुडपून घ्यावी मग परत मुडपलेल्या भागावर २-३ थेंब तेल लावून तांदळाची पिठी भुरभुरावी व परत पुरी मुडपून घ्यावी.
तवा मंद विस्तवावर गरम करायला ठेवावा. एकीकडे पोळी तांदळाच्या पिठीवर हलक्या हातांनी छान गोल लाटावी. तांदळाच्या पिठीमुळे पोळी लाटताना लवकर गोल गोल फिरते. पोळी लाटून झाल्यावर तव्यावर घालून विस्तव मध्यम आचेवर ठेवावा. पोळी थोडी फुगली की उलटी करावी कडा शेकून घ्याव्यात मग परत उलट करावी. मग पोळी खाली उतरवून त्यातील वाफ काढावी. मग त्यावर १/२ टी स्पून तूप लावावे. अश्या सर्व पोळ्या बनवून घाव्यात.