मकर संक्रांतीचे महत्व , माहिती व पूजा कशी करावी : जानेवारी महिना चालू झाला की नवीन वर्षाची सुरवात होते. नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आहे. तामिळनाडू मध्ये पोंगल म्हणून ओळखला जातो, महाराष्ट्रात मकर संक्रांत म्हणून, पंजाबमध्ये लोहरी म्हणून प्रसिद्ध आहे. गुजरात मध्ये मकर संक्रांतीला पतंग उडवण्याची पारंपारिक पद्धत आहे. प्रत्येक प्रांतामध्ये वेगवेगळी पद्धत आहे.
मकर संक्रांत ही इंग्लिश कॅलेंडर प्रमाणे जानेवारी महिन्यात असते व मराठी कॅलेंडर प्रमाणे पौष महिन्यात असते. संक्रांत ही पौष शुक्ल ६ ह्या तिथीला असते. पौष शुक्ल ५ ह्या दिवशी भोगी असते. ह्या दिवशी देवाची पूजा करून भोगीची भाजी (मिश्र भाजी), ज्वारीची अथवा बाजरीची तीळ लावून भाकरी बनवण्याची प्रथा आहे. पौष शुक्ल ७ हा दिवस कींक्रांत म्हणजेच करिदिन असतो. ह्या दिवशी चांगले कोणते काम करीत नाहीत ह्या दिवशी संक्रांती देवीने किक्रांत नावाच्या राक्षसाचा वध केला व त्याच्या जाचातून प्रजेला मुक्त केले.
मकर संक्रांत ह्या वर्षी १५ जानेवारीला आहे. त्याचा पुण्यकाल हा सूर्योदय ते सूर्यास्त परंत आहे.
मकर संक्रांत हा महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. ह्या दिवशी महिला घर आवरून नवीन वस्त्र परिधान करून, दागिने, नाकात नथ घालून तयार होवून बोळक्याची (सुगड) पूजा करून आपल्या संसारासाठी सुख संपती, धन-धान्य कधी कमी पडू नये म्हणून देवाजवळ मागणे करतात.
पूजेसाठी ५ बोळकी (सुगड), १ पणती, नवा पांढरा दोरा, हळद-कुंकू, नवीन कपडा, तीळ-गुळ, ऊस, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर व ताम्हन अथवा स्टीलचे ताट, दिवा व अगरबत्ती घ्यावी.
पाच बोळक्यांना दोरा बांधावा, त्यांना हळद-कुंकू लावावे, त्यामध्ये उसाचे काप, तील-गुळ, गाजर, गव्हाच्या ओंब्या, मटार-हरभरे दाणे, बोर घालावे वरती एक पणती ठेवावी हे सर्व एका स्टीलच्या ताटात ठेवावे वरतून एक नवीन कापड घालून झाकून ठेवावे. समोर निरांजन, अगरबत्ती लावावी. ह्याचा अर्थ माझ्या संसारात धनधान्य, कपडा लक्ता कशाची कमरता पडू नये व माझ्या सुखी संसाराला कोणाची वाईट नजर लागू नये.
संक्रांतीला तिळाचे फार महत्व आहे. ह्या दिवशी महाराष्ट्रात तिळ व गुळ वापरून पदार्थ बनवण्याची प्रथा आहे. तिळाची चटणी, तिळाची वडी, तिळाचे लाडू, तीळ-गुळाची पोळी ह्याचा नेवेद्य बनवतात. घरासमोर सडा घालून रांगोळी काढली जाते.
मकर संक्रांतीला नवीन लग्न झालेल्या मुलीला माहेर कडून काळी चंद्रकळा, हळद-कुंकूचा कोयरी अथवा करंडा देवून तीळ-गुळ वापरून दागिने बनवून तिला परिधान करायला देतात जावई बापूंना चांदीची वाटी तील-गुळ घालून द्यायची प्रथा महाराष्ट्रात आहे. संध्याकाळी महिलांना (सुवासीनीना) घरी हळदी-कुंकूला बोलवून त्यांना हळद-कुंकू अत्तर लावून वाण म्हणून बांगड्या, नारळ, आरसा, एखादी स्टीलची वस्तू, किंवा फळ वाण म्हणून दिले जाते.
मकर संक्रांती ह्या दिवशी एकमेकांनच्या घरी जावून तिल-गुळ देवून आपल्या मनातील क्रोध, लोभ, भांडण विसरून एकमेकांशी गोड बोलायचे व आपल्या स्नेह संबंधातील कटुता नष्ट करून मैत्री कायम करायची असते. म्हणूनच ह्या दिवशी म्हणतात “तील-गुळ घ्या गोड बोला” तसेच एकमेकांना योग्य चांगली दिशा दाखवायची.
संक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचे बोरन्हाण करायची महाराष्टात पद्धत आहे. ह्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून मलमलचे कपडे घालून संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे. तेव्हा एका भांड्यामध्ये चुरमुरे, तील-गुळ, साखर फुटणे, बोर, चॉकलेट, मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात. हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो. सर्व लहान मुले गुण्यागोविंदाने ह्या मध्ये भाग घेतात.
संक्रातीच्या दुसऱ्या दिवशी कीक्रांत असते. त्यादिवशी चांगले कोणते काम करू नये.
हळदी कुंकू रथ सप्तमी पर्यंत करता येते.
See more information about Makar Sankranti in this article- Makar Sankranti Information and Puja-Vidhi