झटपट अंड्याचे स्वीट कॉर्न सूप मुलांसाठी: सूप हे लहान मुले अगदी आवडीने घेतात. स्वीट कॉर्नचे सूप अगदी चवीस्ट लागते. मक्याच्या कणसाचे हे सूप बनवायला अगदी झटपट आहे तसेच बनवायला सोपे सुद्धा आहे. हे सूप बनवतांना मक्याचे कणीस, अंडे, मिरे पावडर, कॉर्नफ्लोर, सोया सॉस, वापरले आहे. ह्यामध्ये फक्त चवीपुरती मिरे पावडर वापरली आहे तसेच सोया सॉस पण फक्त चवी पुरता वापरला आहे. त्यामुळे हे सूप लहान मुलांना खूप आवडेल. मुलांना जर सर्दी झाली बरे नसेल तर हे गरम गरम सूप द्यावे म्हणजे सूप घेतल्यावर एकदम छान तरतरी वाटेल.
अंड्याचे स्वीट कॉर्न सूप मुलांसाठी: ३० मिनिट
वाढणी: ४ जणांसाठी
साहित्य:
२ मोठी मक्याची कणसे
२ अंडी
२ टे स्पून कॉर्न फ्लोर
१/२ टे स्पून सोया सॉस
मिरे पूड, साखर व मीठ चवीने
१ टे स्पून बटर
१ छोटा कांदा
कृती: मक्याची कणसे किसून घ्या. कांदा बारीक चिरून घ्या.
कुकरमध्ये बटर गरम करून त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालून थोडा परतून घ्या. मग त्यामध्ये किसलेले मक्याचे कणीस घालून ४ कप पाणी घालून कुकरचे झाकण लावून दोन शिट्या काढाव्यात.
कुकरचे झाकण काढून त्यामध्ये सोया सॉस, मीठ व साखर घालून मिक्स करून घ्या. मग अंडे वरतून थोडेसे फोडून अंड्यातील फक्त पांढरे हळूहळू सुपामध्ये घालून चांगले ढवळून घ्यावे (अंड्यातील पिवळे बलक सुपामध्ये पडता कामा नये) व एक चांगली उकळी आणावी. उकळी आल्यावर मिरे पावडर घालून मिक्स करून घ्यावे.
अंड्याचे स्वीट कॉर्न सूप गरम गरम मुलांना सर्व्ह करावे.