संत्र्याचे मोदक: मोदक हे गणपती बाप्पांचे अगदी आवडते. गणपती बाप्पांच्या चतुर्थीसाठी संत्र्याचे मोदक. आपण संत्र्याची बर्फी, संत्र्याचे ज्यूस कसे बनवायचे बघितले. संत्र्याचे मोदक दिसायला फार छान दिसतात तसेच चवीलापण उत्कृष्ट लागतात. संत्र्याचे मोदक बनवतांना ओला नारळ, साखर व संत्री सोलून त्याचे तुकडे, दुध, ड्रायफ्रुट व ऑरेंज ईमलसन वापरले आहे. ऑरेंज ईमलसने मोदकाला रंग व सुगंधपण छान येतो. ह्या मापामध्ये ११ मोदक बनतात. गणपती बाप्पांना ५, ७, ११ किंवा २१ मोदकाचा नेवेद्द दाखवतात.
The English language version of the same Modak recipe can be seen here- Santra Modak
संत्र्याचे मोदक बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ११ मोदक
साहित्य:
सारणासाठी:
२ कप नारळ (खोवून)
२ कप दुध
३/४ कप साखर
२ संत्री (सोलून त्याचा फक्त गर घेणे)
२ थेंब ऑरेंज ईमलसन
ड्राय फ्रुट तुकडे
आवरणासाठी:
१ कप मैदा
१ कप रवा
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
तूप मोदक तळण्यासाठी
कृती:
सारणासाठी: एका कढईमध्ये खोवलेला नारळ व दुध घालून आटवून घ्यावे. त्यामध्ये साखर व संत्र्याचे तुकडे घालून घट्ट शिजवून घ्यावे. मग त्यामध्ये ऑरेंज ईमलसन व ड्रायफ्रुट घालून मिक्स करून थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर त्याचे एक सारखे आकरा भाग करावे.
आवरणासाठी: मैदा, रवा, मीठ, गरम तेल मिक्स करून थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पीठ फार घट्ट किंवा सैल नसावे. पीठ मळून मग अर्धा तास बाजूला ठेवून त्याचे ११ गोळे बनवा.
मोदक बनवतांना एक गोळा घेवून पुरी सारखा लाटून त्यामध्ये एक सारणाचा भाग ठेवून पुरी बंद करून मोदकाचा आकार द्यावा.
कढई मध्ये तूप गरम करून मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावेत.