सुक्या खोबऱ्याच्या करंज्या: सुक्या खोबऱ्याच्या करंज्या ह्या दिवाळीच्या फराळासाठी करतात. ह्या करंज्या टेस्टी होतात. तसेच बनवायला सोप्या व लवकर होणाऱ्या आहेत. करंजी हा पदार्थ महाराष्ट्रात लोकप्रिय आहे. करंज्यामध्ये वेगवेगळे सारण भरून बनवता येतात पण सुक्या खोबऱ्याच्या करंज्या ह्या महाराष्ट्रात पारंपारिक आहेत. ह्या करंज्या ८-१० दिवस चांगल्या टिकतात. ह्या करंज्या बनवतांना खवा सुद्धा वापरू शकता त्याने चवपण छान येते.
The English language version of this Karanji preparation can be seen here – Recipe for Dry Coconut Karanji for Diwali
सुक्या खोबऱ्याच्या करंज्या बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २० करंज्या बनतात
साहित्य:
आवरणासाठी:
१ कप मैदा
१ कप रवा
१/४ कप तेल
मीठ चवीने
सारणासाठी:
२ कप सुक्या खोबऱ्याचा कीस
१ कप रवा
२ कप पिठीसाखर
१ टेस्पून खस खस
१/४ कप ड्राय फ्रुट (काजू बदाम तुकडे व किसमिस)
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून जायफळ पावडर
तेल किंवा वनस्पती तूप करंजी तळण्यासाठी
कृती:
आवरणासाठी: रवा मैदा, गरम तेल, मीठ व जेव्हडे लागेल तेव्हडे पाणी घेवून घट्ट पीठ मळून घ्या. मळलेला आटा दोन तास तसाच ठेवा.
सारणासाठी: सुके खोबरे किसून छान गुलाबी रंगावर भाजून घ्या मग थंड झाल्यावर थोडे चुरून घ्या. खस खस थोडी भाजून कुटून घ्या. रवा एक टे स्पून तुपावर गुलाबी रंगावर भाजून घ्या. ड्राय फ्रुटचे तुकडे करून घ्या. सुके खोबरे, खस-खस, रवा, ड्राय फ्रुटचे तुकडे, वेलची पावडर, जायफळ पावडर मिक्स करून सारण बनवून घ्या.
भिजवलेल्या पीठाचे २० गोळे बनवून घ्या. एक गोळा घेवून पुरी सारखा लाटा त्यावर एक टेबल स्पून सारण ठेवून पुरीला २-३ थेंब दुध कडेनी लावा व पुरी मुडपून घ्या. मग त्याला करंजीचा आकार द्या. अश्या सर्व करंज्या बनवून घ्या. एक कपडा घेऊन ओला करून घट्ट पिळून घ्या मग ओल्या कापडामध्ये करंज्या ठेवा म्हणजे करंज्या सुकून फुटणार नाहीत.
एका कढईमध्ये तूप गरम करून करंज्या गुलाबी रंगावर तळून घ्या. कारंजी तळून झालीकी एका पेपरवर ठेवत जा म्हणजे जास्तीचे तूप पेपरवर जाईल.
करंज्या तळून झाल्याकी घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.