टोमाटो ऑम्लेट: टोमाटो ऑम्लेट हा पदार्थ सकाळी नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर सुद्धा बनवता येतो. टोमाटो ऑम्लेट हे चवीला छान खमंग लागते. ह्यामध्ये टोमाटो व हिरवी मिरची मिक्सर मधुन थोडी बारीक करून घेतली आहे व त्या मध्ये बेसन भिजवले आहे त्यामुळे ऑम्लेटची चव छान आंबटगोड अशी येते. तिखट हवे असेल तर अजून दोन मिरच्या चिरून घाला. तांदळाचे पीठ घातल्यामुळे चांगले क्रिस्पी होते. जिरे घातल्यामुळे चव चांगली लागते.
The English language version of this Omelette preparation method can be seen here – Tasty and Crisp Tomato Omelette
टोमाटो ऑम्लेट बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट
वाढणी: ४
साहित्य:
२ कप चणाडाळ पीठ (बेसन)
२ टे स्पून तांदळाचे पीठ
५ हिरव्या मिरच्या (चिरून)
३ मोठे टोमाटो (चिरून)
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून जिरे
१/४ कप कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
तेल टोमाटो ऑम्लेट फ्राय करण्यासाठी
कृती:
चिरलेले टोमाटो व हिरवी मिरची थोडी मिक्सरमध्ये वाटून घ्या. कोथंबीर चिरून घ्या.
चणाडाळ पीठ, तांदळाचे पीठ, वाटलेले टोमाटो, जिरे, हळद, लाल मिरची पावडर, कोथंबीर, मीठ मिक्स करून मिश्रण बनवून घ्या.
तिखट आवडत असेलतर अजून दोन हिरव्या मिरच्या वरतून चिरून घाला.
नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर एक टी स्पून तेल घालून १/४ मिश्रण तव्यावर घाला व एका सारखे पसरवून घेवून बाजूनी तेल घाला. ओम्लेट दोनी बाजूनी छान खरपूस भाजून घ्या.
गरम गरम टोमाटो ऑम्लेट टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.