चैत्र् शुद्ध १ ह्या दिवसा पासून हिंदूचे नववर्ष आरंभ होते. ह्या दिवशी महाराष्ट्रामध्ये घरोघरी गुडी उभारून हा सण साजरा करतात. ह्या दिवशी घरासमोर सडा घालून रांगोळी घालतात, देवाची पूजा करून महानैवेद्द करतात. देवाजवळ नवीन वर्ष सुख, समृद्धीचे, चांगले आरोग्याचे जावे म्हणून प्रार्थना करतात.
गुडी उभारतांना काठीला वरच्या बाजूला रेशमी वस्त्र, कडू लिंबाची डहाळी, आंब्याची पाने, फुलांचा हार व साखरेची गुडी बांधून वरती चांदीचा किवा तांब्याचा कलश लावावा. कलशा वरती कुंकू ओले करून स्वस्तिक काढावे. व गुडी दरवाजाच्या बाजूला लावावी. ती जागा स्वच्छ धुवून घ्यावी त्यावर रांगोळी काढावी मग वरती गुडी बांधावी. गुडीला गंध, अक्षदा, फुले वाहून पूजा करावी व आरती करावी व नेवेद्य म्हणून दुध-साखर अथवा पेढा ठेवावा. दुपारी गोडाचा नेवेद्य दाखवावा.
गुडी पाडवा ह्या दिवसाला वर्ष प्रतिपदा असे सुद्धा म्हणतात. चैत्र् शुद्ध १ हा दिवस साडेतीन मुहूर्तातला एक महत्वाचा दिवस मानला जातो. ह्या दिवशी आरोग्य प्रतिपदा व्रत, विद्याव्रत व तिलव्रत करावे म्हणजे आपले आयुष्य सुखाचे जाते असे म्हणतात. हा दिवस पूर्ण दिवस शुभ मानला जातो. ह्या दिवशी सोने खरेदी करतात, नवीन वस्तू, नवीन वास्तू घेतात, नवीन वाहन घेतात, नवीन घरात प्रवेश करतात.
गुडी पाडवा ह्या दिवशी प्रभू रामचंद्र १४ वर्षाचा वनवास संपवून आयोध्येत आले तेव्हा त्याच्या स्वागतासाठी आयोध्येतील प्रजेनी गुड्या उभारून प्रभू रामचंद्राचे स्वागत केले. गुडी उभारण्या मागचा कारण म्हणजे आनंद, स्वागत व विजय ह्याचे प्रतीक आहे.
चैत्रामध्ये झाडांना नवीन पालवी येते व श्रुष्टी हिरवी गार दिसते. ह्या दिवशी कडुलिंबाची पाने खावीत त्यामागचे हेतू हा की कडुलिंबाच्या पाने खाल्याने आपली पचनशक्ती चांगली होते.
चैत्र शुक्ल ३ पासून वैशाख शुक्ल ३ परंत गौरी व विष्णू ह्या देवतांची पूजा अर्चा करतात.
चैत्र शुक्ल ३ पासून वैशाख शुक्ल ३ परंत महाराष्ट्रात गौर उत्सव साजरा करतात. ह्या काळात महिला चैत्र गौरीचे हळदी कुंकू थाटामाटाने करतात मित्र परिवारातील, नातेवाईकातील स्त्रीयांना तसेच मुलीना हळदी कुंकू साठी बोलवले जाते. तेव्हा गौरीला सजवून पूजा अर्चा करून हळद कुंकू, अत्तर, फुल देवून प्रसाद म्हणून कैरीची वाटली डाळ, भिजवलेले हरबरे, कैरीचे पन्हे दिले जाते. रात्री गौर जागवून झिमा, फुगडी खेळ खेळले जातात.
चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी येते ह्या दिवशी रामजन्माचा सोहळा साजरा करतात. रामाची पूजा करून पूर्ण दिवस उपवास करतात. ह्या दिवशी रामाची भजने, कीर्तने तसेच रामायण सांगितले जाते. सुंठवडा प्रसाद म्हणून दिला जातो. आयोध्येत, तिरुपतीला तसेच रामेश्वरला राम जन्माचा सोहळा बघण्या सारखा असतो.
चैत्र पौर्णिमेला श्री हनुमान जयंती असते. महाराष्टात सूर्योदयापूर्वी पुरुष मंडळी हनुमानाची पूजा करून अन्न दान करतात.
चैत्र महिन्यात निरनिराळ्या गावामध्ये वेगवेगळ्या ग्राम देवतांची जत्रा भरते व उत्सव साजरे केले जातात.