झटपट बटाट्याचा रस्सा: बटाटे म्हंटले की बटाट्याचे नानाविध प्रकार करता येतात. बटाट्याची कोणत्याही प्रकारची भाजी अथवा रस्सा छानच लागतो. बटाट्याचा झटपट रस्सा बनवायला अगदी सोपा आहे. आपल्याकडे अचानक पाहुणे आले असतील तर हा रस्सा बनवायला अगदी छान आहे. तसेच हा रस्सा चवीस्ट लागतो. अश्या प्रकारचा रस्सा लहान मुलांना खूप आवडतो तिखट नसल्यामुळे मुले आवडीने खातात. साजूक तुपाची फोडणी दिल्यामुळे चव सुंदर लागते.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
४ मध्यम आकाराचे बटाटे
५ हिरव्या मिरच्या
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१/२ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
फोडणी साठी:
२ टे स्पून तूप (साजूक)
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हळद
कृती:
बटाटे उकडून, सोलून हातानी मोडून घ्या. म्हणजे मध्यम आकाराच्या फोडी करा. हिरव्या मिरच्या मध्ये उभ्या चिरून घ्या.
कढईमधे तूप गरम करून जिरे, हिरव्या मिरच्या घालून हळद घाला. मग बटाट्यच्या फोडी घालून एक मिनिट परतून त्यामध्ये लाल मिरची पावडर, मीठ घालून २ कप पाणी घालून चांगली उकळी आणा.
रस्सा थोडा घट्ट सर झाला की कोथंबीर घालून मिक्स करा.
गरम गरम रस्सा चपाती/पराठा किंवा फुलक्या बरोबर सर्व्ह करा. हा रस्सा पुरी बरोबर सुद्धा छान लागतो.