पापलेट किंवा मासे ताजे आहेत हे कसे ओळखावे ?
माश्याचा तोंडाचा भाग दाबून पाहिला असता आतून पांढरे पाणी निघाले टर टे चांगले आहेत असे ओळखावे. पेडवे, तारले, पाचसळी, बांगडे ह्या माशांचे डोळे लाल व चकचकीत असले म्हणजे ते मासे ताजे आहेत असे समजावे.
कोलंबी ही मऊ व अगदी रंगाने फिकट दिसत असेलतर ती ताजी नाही असे समजावे. बोंबीलची तोंड बंद असून ती लाल असावीत. चिंबोऱ्या काळ्या असाव्यात व भरीव असाव्यात सारंगा ताजा कसा ओळखावा ते म्हणजे त्याचे खवले घट्ट व ताजे असावेत व त्याला कुबट वास नसावा. जर कुबट वास येत असेलतर त्या शिळ्या आहेत असे समजावे.
दुसऱ्या किंवा तिसऱ्या ताज्या कश्या ओळखाव्यात तर त्याच्या शिंपल्याची तोंडे उघडली नसावीत.
मासे कसे साफ करावेत
मासे साफ करतांना जरा काळजी घ्यावी. मासे साफ करतांना काही जण सुरी, विळी, कात्री व कोयता उलट्या बाजूनी वापरतात. आपण घरी मासे साफ करतांना सुरी, कात्री अथवा विळी चा उपयोग करतो. कोळी लोकं कोयत्याचा उपयोग करतात. त्याने माशाचे खवले सरासर निघतात. विळीवर मासे साफ करतांना माशाची दोनी टोके दोनी हाताच्या बोटांनी घट्ट पकडून मासा आडवा पकडून वीळीच्या पात्यावर हलकेच फिरवत खवले काढावेत.
मोठे मासे म्हणजे पापलेट, सरंगा, घोळ, रावस, सुरमई साफ करतांना त्याचे डोळे, पोटातील बाजू, आतील पिताशय , तोंड काढून साफ करावे. नंतर त्याला मीठ लाऊन अर्धा तास ठेवावे. नदीचे मासे अथवा गोड्या पाण्यातील मासे थोडे जास्त मीठ लाऊन ठेवावे म्हणजे ते चवीस्ट लागतात.
कोलंबी साफ करतांना त्याचे कवच पूर्ण काढून टाकावे मग कोलंबी मधली काळा धागा काढावा कारण हा काळा धागा फार पिक्तकारक असतो.
चिंबोऱ्याचे पाय काढून व ढेगेही काढून एका बाजूस ठेवावी.व वरचे कवच काढून आतील पेद्याचा पदार्थ बनवावा पेंद्याच्या मधील पिवळी लाखही काढून टाकावी म्हणजे कडवट पणा नाहीसा होतो.
मांदेली साफ करतांना दोनी हाताच्या बोटांनी मांदेली आडवी धरून त्याचे खवले काढून, तोंडाचा भाग काढून पोटतील भाग साफ करावा.
मासे कसे शिजवावे किंवा तळावेत?
प्रथम मासे साफ करून तीन-चार वेळा स्वच्छ पाण्यानी धुवून घ्या. मग माश्याच्या पोटातील ओशट काढून टाकावे म्हणजे उग्र वास किंवा कडवट पणा येणार नाही. मग माश्याला मसाला चोळून व्हीनीगर, लिंबू किंवा चिंचेचा कोळ लावावा म्हणजे उग्र वास निघून जाईल व चवपण चांगली लागेल. मासे तळताना जास्त तेलात तळावे. तसेच तळताना सारखे उलट सुलट करू नये नाहीतर ते मोडतील.
माश्याची आमटी बनवतांना पाणी अथवा नारळाचे दुध बेताने घालावे कारण की मासे शिजायला जास्त वेळ लागत नाही ते लवकर शिजतात म्हणूनच पाणी बेताने घालावे. आमटी बनवतांना जरा पसरट भांडे घ्यावे म्हणजे मासे हलवताना तुटणार नाही.
अश्या प्रकारे काही गोष्टी लक्षात ठेवल्यातर काही गोंधळ होणार नाही.