गोड शंकरपाळ्या किंवा गुळाच्या कापण्या: गुळाच्या कापण्या ह्या महाराष्टातील सातारा-सांगली ह्या भागात बनवल्या जातात. साधारणपणे आषाढ महिन्यात देवाला नेवेद्या साठी दाखवल्या जातात. गुळ हा आपल्या आरोग्यासाठी किती गुणकारी आहे ते आपल्याला गुळाचे गुणधर्म ह्या लेखामध्ये वाचायला मिळेल.
गुळाच्या कापण्या बनवतांना गव्हाचे पीठ व बेसन वापरले आहे. तसेच ह्यामध्ये बडीशोप, सुंठ, खसखस व गुळ वापरला आहे. बडीशेप, खसखस, सुंठ हे सुद्धा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहेत.
बनवण्यासाठी वेळ: ५० मिनिट
वाढणी: ५-६ जणासाठी
साहित्य:
२ कप गव्हाचे पीठ
१ कप हरबरा डाळ (चणाडाळ)
१ टे स्पून बडीशेप
१ टी स्पून सुंठ पावडर (सुंठ पावडर म्हणजे सुकलेले आले)
१ १/२ कप गुळ (किसून)
४ टे स्पून साखर
मीठ चवीने
तेल कापण्या तळण्यासाठी
कृती:
बडीशेप थोडीशी भाजून त्याची पूड करून घ्या. खसखस थोडीशी गरम करून बाजूला ठेवा.
गुळ चिरून त्यामध्ये साखर घालून एक कप कोमट पाण्यात विरघळवून घ्या.
गव्हाचे पीठ, बेसन मीठ चाळून घ्या. मग त्यामध्ये बडीशेप पावडर, सुंठ पावडर घालून चवीने मीठ घालून मिक्स करून घ्या. मग त्यामध्ये दोन टे स्पून कडकडीत तेल घालून चांगले मिक्स करून घेऊन गुळाच्या पाण्यानी थोडे घट्ट भिजवून घ्या. पीठ भिजवताना अजून लागेत तसे पाणी वापरून पीठ भिजवा. पीठ भिजवून झाल्यावर अर्धा तास बाजूला ठेवा. नंतर पीठाचे एकसारखे चार गोळे करून घ्या.
एक गोळा घेवून थोडासा लाटून झाल्यावर त्यावरती थोडी खसखस घालून पोळी सारखा जाडसर लाटून घ्या. मग शंकरपाळी सारख्या कापून घ्या.
कढई मध्ये तेल गरम करून शंकरपाळ्या छान कुरकुरीत तळून घ्या.