पालक पांढऱ्या सॉसमध्ये: पालकची आपण पातळ भाजी, पालक पनीर अथवा पंजाबी पालक बनवतो. पालकची भाजी ही स्वीट कॉर्न मिक्स करून पांढऱ्या सॉस मध्ये बनवली आहे. पांढऱ्या सॉस मध्ये पालकची भाजी खूप टेस्टी लागते. अश्या प्रकारची भाजी पराठ्या बरोबर छान लागते तसेच एक विशेष म्हणजे ही भाजी टोस्ट बरोबर खूप छान लागते. अश्या प्रकारची पालकची भाजी माझ्या एका डॉक्टर मैत्रिणीने बनवली होती ती मला खूप आवडली म्हणून मी करून बघितली तर आमच्याकडे सुद्धा खूप आवडली. करून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल.
पालकची पांढऱ्या सॉस मधील भाजी बेक करून सुद्धा छान लागते.
The English language version of the same spinach dish preparation method can be seen here – Spinach in White Sauce
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ लहान पालक जुडी
१/२ कप स्वीट कॉर्न दाणे
१ चीज क्यूब (किसून)
१ मँगी क्यूब
मीठ चवीने
फोडणी साठी
१ टे स्पून तेल
१ मध्यम आकाराचा कांदा (चिरून)
४-५ लसूण पाकळ्या (ठेचून)
२ हिरव्या मिरच्या (चिरून)
पांढरा सॉस बनवण्यासाठी
१ टे स्पून बटर
१ कप दुध
२ टे स्पून गव्हाचे पीठ
१/२ टी स्पून मिरे पावडर
मीठ चवीने
कृती
पालक निवडून स्वच्छ धुवून चिरून घ्या.
एका कढाईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण ठेचून घाला व मग चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घ्या. कांदा परतून झाल्यावर चिरलेला पालक, स्वीट कॉर्न दाणे, हिरवी मिरची घालून पालक मंद विस्तवावर शिजवून घ्या. (पालक शिजताना पाणी घालू नका)
पांढरा सॉस बनवण्यासाठी: पालक शिजत असतांना दुसऱ्या एका कढाई मध्ये बटर गव्हाचे पीठ घालून मंद विस्तवावर गुलाबी रंगावर दोन मिनिट भाजून घ्या मग त्यामध्ये हळूहळू दुध घालून हलवत रहा, हलवत असतांना गुठळी होऊ देऊ नका. सॉस शिजल्यावर त्यामध्ये चवीने मीठ व मिरी पावडर घालून एक उकळी आणा.
पालक शिजल्यावर पांढरा सॉस घालून, मीठ चवीने, किसलेले चीज व मँगी क्यूब घालून, एक उकळी आणा. जर आपल्या उकळी आणायची नसेल तर १८० डिग्रीवर १०-१२ मिनिट बेक करा.
गरम गरम पालकची भाजी व टोस्ट सर्व्ह करा. टोस्ट बरोबर ह्या भाजीची चव अप्रतीम लागते.