शाही मुगाच्या डाळीचे मोदक: मुगाच्या डाळीचे मोदक हे चवीला उत्कृष्ट लागतात. आपण नेहमी नारळ वापरून सारण बनवून त्याचे मोदक बनवतो. नारळाच्या आयवजी मुगाच्या डाळीचे सारण भरून मोदक बनवा.
बनवण्यासाठी वेळ: ९० मिनिट
वाढणी: २१ मोदक
सारणासाठी साहित्य:
१ कप मुगाची डाळ
१/२ कप साजूक तूप
३/४ कप साखर
१/२ लिटर दुध
५० ग्राम खवा
१/४ टी स्पून केशर ईसेन्स
१/२ टी स्पून केशर रंग
१ टी स्पून वेलचीपूड
२ लवंग
१/४” दालचीनी तुकडा
आवरणासाठी:
२ कप तांदळाचे पीठ
२ कप पाणी
२ टी स्पून मैदा
२ टी स्पून तूप/तेल
मीठ चवीने
कृती: सारणासाठी:
मुगडाळ धुवून ६-७ तास भिजत ठेवा. नंतर पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
कढईमधे तूप गरम करून वेलची दाणे, दालचीनी तुकडा, लवंग घालून १० सेकंद गरम करून लगेच वाटलेली मुगडाळ घालून मिक्स करून मंद विस्तवावर गुलाबी रंग येइ परंत भाजून घ्या. मग त्यामध्ये गरम दुध हळूहळू घालून मिक्स करून घ्या. दुध घातल्यावर मिश्रण घट्ट होई परंत मंद विस्तवावर हलवत रहा. मग त्यामध्ये साखर व खवा घालून मिक्स करून घेऊन घट्ट होई परंत शिजवून घ्या. हलवा घट्ट झालाकी त्यामध्ये वेलचीपूड, वेलची इसेन्स घालून ड्राय फ्रुट घालून मिक्स करून एक चांगली वाफ येऊ द्या.
आवरणासाठी :
एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी गरम करून त्यामध्ये मीठ व तेल घालून, पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा मिक्स करून हलवून भांड्यावर झाकण ठेवा व दोन मिनिट त्याला वाफ येवू द्या.
नंतर शिजलेले पीठ परातीत काढून घेवून ओल्या हाताने चांगले मळून घ्या. मग त्याचे लिंबा एव्ह्डे गोळे करून हातावर पुरी सारखे थापून त्यामध्ये एक चमचा मिश्रण ठेवून पुरी बंद करा व त्याला मोदकाचा आकार द्या. असे सर्व मोदक तयार करून घ्या.
मोदक पात्रात पाणी गरम करून घ्या. मोदक पात्राच्या चाळणीवर एक केळीचे पान ठेवून त्यावर पाणी शिंपडून सर्व मोदक लावून घ्या. परत मोडका वरती एक केळीचे पान ठेवून मोदक पात्राचे झाकण घट्ट लावून १५ मिनिट मोदक उकडून घ्या.
गरम गरम मोदक वरतून साजूक तूप घालून सर्व्ह करा.
टीप : तांदळाचे पीठ जुने नसावे. नाहीतर मोदक चांगले होणार नाहीत.
मोदक पात्र नसेल तर मोठे भांडे घेवून त्यामध्ये पाणी घालून त्यावर चाळणी ठेवावी व त्यावर केळीचे पाने ठेवून मोदक ठेवून घट्ट झाकण ठेवून झाकणावर थोडे वजन ठेवावे म्हणजे वाफ जाणार नाही.
मोदक झाल्यावर मोदक ओल्या हातांनी काढावे म्हणजे तुटणार नाहीत.