श्री सत्यनारायण पूजा आपल्या सर्वांना परिचयाची आहे. सत्यनारायणाची पूजाही दर महिन्याच्या पौर्णिमेला तसेच संक्रांतीला केलेली फलदाई असते. पण वेळेच्या अभावी आपल्याला दरमहिन्याच्या पौर्णिमेला करणे शक्य होत नसेल तर इतर चांगल्या दिवशी करावी.
श्री सत्यनारायण पूजा कमी वेळात कशी करता येईल ते मी लिहीत आहे. ही पूजा आपण आपली करता येते. आज काल सगळ्यांना वेळेची टंचाई आहे. प्रतेकजण कामामध्ये व्यस्त आहे. त्यामुळे आपल्या काही पारंपारिक रीतीरिवाज कमी व्हायला लागले आहेत. त्यामुळे आपल्या भावी पिढीला आपले रीतीरिवाज माहिती होणार नाहीत. म्हणूनच आपण आपले रीतीरिवाज थोडक्यात केले तर आपल्याला त्याचे समाधान सुद्धा मिळते.
श्री सत्यनारायण पूजा करण्यासाठी खालील सामानाची तयारी करावी.
पूजेसाठी खालील साहित्य आहे.
हळद, कुंकू, गुलाल, अष्टगंध, रांगोळी, उदबत्ती, कापूर, १५ विड्याची पाने, १ नारळ, ५ बदाम, ५ हळकुंड, ५ सुक्या खोबऱ्याचे छोटे तुकडे, ५ सुपाऱ्या, नाणी (एक रुपयाची), ६ केळी, १ तुळशीच्या पानांची जुडी, २ हार, फुले, तांदूळ किंवा गहू, काडेपेटी, सत्यनारायण कथेचे पुस्तक ई.
पाट, १ तांब्या, २ ताम्हण, पळी, पंचपात्र, घंटा, बाळकृष्ण, श्री सत्यनारायण फोटो नसेल तर श्री दत्तात्रय फोटो, निरंजन (तुपाची फुलवात), कापसाची वस्त्रे, समई (तेलाची वात), काडेच पेटी, पूजेसाठी तबक, गुळ-खोबरे, प्रसादाचा शिरा, पंचामृत, महाप्रसाद (जे काय बनवले आहे)
श्री सत्यनारायण पूजेचा प्रसाद साहित्य:
साजूक तूप, रवा, साखर, दुध प्रतेकी सव्वा ह्या मापाने प्रमाण घ्यावे (म्हणजे सव्वा वाटी, भांडे, सव्वा शेर, वगैरे) प्रसाद झाल्यावर सव्वा केळे बारीक चिरून घालावे. प्रसाद देतांना प्रसादाची मुद पाडून द्रोणात प्रसाद द्यावा.
श्री सत्यनारायण पूजेसाठी पंचामृत:
दुध, मध, दही, तूप, साखर सर्व सम प्रमाणात घ्यावे.
श्री सत्यनारायण पूजा करायची वेळ:
आपले मन जेव्हा प्रसन्न असेल किंवा जो दिवस चांगला असेल त्या दिवशी पूजा केली तरी चालते. पण पौर्णिमा व संक्रांत ह्या दिवशी पूजा करावी हे दिवस पूजेसाठी विशीष्ट आहेत. सकाळी पहाटे उठून करावी हा काल पूजे साठी छान आहे. संध्याकाळी पूजा करायची वेळ सुद्धा छान आहे पण मग पूजा होई परंत उपवास करावा.
आता आपण बघू या श्री सत्यनारायण पूजेची मांडणी कशी करायची:
सकाळी लवकर उठून आपले घर झाडून, पुसून घ्यावे, अंघोळ करून घरासमोर छान रांगोळी काढावी. ज्या ठिकाणी पूजा करायची आहे त्या ठिकाणी चौरंग असेल तर ठेवावा नाहीतर पाट ठेवावा. बाजूनी रांगोळी काढावी व रांगोळीवर हळद कुंकू वहावे. चौरंगाच्या किंवा पाटाच्या मध्य भागी एक भांडेभर तांदूळ किंवा गहू ठेवावेत त्यावर कलश ठेवावा, कलशामध्ये थोडे पाणी, नाणे, अक्षता (अक्षता म्हणजे तांदूळ) फुल, दुर्वा गंध घालावे. पाच विड्याची पाने कलशावर ठेऊन नारळ ठेवावा. कलशाला व नारळ ह्यांना हळद-कुंकू लावून हार घालावा. श्री सत्यनारायण अथवा श्री दत्तात्रय ह्याच्या फोटोला हार घालावा. चौरंगाच्या उजव्या बाजूस मुठभर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी गणपती म्हणून ठेवावी किंवा गणपतीची मूर्ती ठेवावी. पूजेसाठी बाळकृष्ण घ्यावा व कलशाच्या समोर ठेवावा. कलशाच्या समोर विड्याची पाने दोन-दोन अश्या प्रकारे पाच भाग ठेवावे. त्यावर खारीक, सुपारी, हळकुंड, बदाम, नाणे, केळे ठेवावे. कलशाच्या बाजूला तेलाची वात घालून समई लाऊन ठेवावी. कलशाच्या बाजूला समई लावावी.
एका प्लेटमध्ये किंवा तबकामध्ये हळद, कुंकू, अष्टगंध, अक्षता, फुले, तुळस, थोडे वाटीत दुध, दुर्वा, पंचपात्रात पाणी व पळी ठेवावी, निरांजनामध्ये तुपाची वात घालून ठेवावी, तुळशीची पाने धुऊन १०८ पाने काढून ठेवावी. (ह्या तुळशीच्या पानांनी १०८ वेळा श्री विष्णूची नावे घ्यायची.) अजून एक रिकामी प्लेट घ्यावी.
पूजेची मांडणी करून झाल्यावर पूजा चालू करण्या अगोदर आपल्या वरिष्ठाच्या पाया पडाव्यात. मग पूजेला सुरवात करावी. आपले मन प्रसन्न ठेवावे.
पूजे समोर बसून नमस्कार करून गणपतीच्या प्रतिमेला व बाळकृष्णला हळद-कुंकू, दुर्वा, फुले वहावीत. तसेच घंटीची व दिव्याची पूजा करावी.
पुजा झाल्यावर १०८ वेळा श्री विष्णूची नावे उचारून एक एक तुळशीचे पान अर्पण करावे. (त्यासाठी आपल्याला मार्केट मध्ये सत्यनारायण कथेचे पुस्तक मिळते.) नंतर श्री सत्यनारायण ची कहाणी वाचवी. कहाणी वाचून झाल्यावर पंचामृत व प्रसादाचा शिरा पूजे समोर ठेऊन हळद-कुंकू, तुळशीचे पान, फुल वहावे.
मग घरातील सर्वानी कहाणी आईकण्यास बसावे. पुस्तकातील पाच अध्याय वाचावे. मग श्री सत्यनारायण यांची आरती, गणपतीची आरती म्हणावी. श्री सत्यनारायण पूजा केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात.
आरती म्हणून झाल्यावर महाप्रसाद दाखवावा.
दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करावी. श्री सत्यनारायण ह्याच्या प्रतिमेला हळद-कुंकू, फुले वाह्वावीत, गुळ-खोबऱ्याचा नेवद्य दाखवावा व कलशातील पाणी विड्याच्या पानाने सगळ्या घरात शिंपडावे तसेच घरातील मंडळींवर पण शिंपडावे, राहिलेले पाणी तुळशीला वाहवावे.
अश्या प्रकारे पूजा संपन्न करावी. काही जणांना अश्या प्रकारची पूजा आक्षेपार्य वाटेल पण मला असे वाटते की आजकाल वेळे अभावी असे करायला हरकत नाही. फक्त आपले मन शुद्ध ठेवून कोणतीही चांगली गोष्ट केलेली आपल्या देवाला मान्य असते. अश्या मुळे जर कोणाचे मन दुखावले गेले असेल तर क्षमस्व.