मिश्र पीठाचे थालीपीठ: मिश्र पीठाचे थालीपीठ हे नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात देण्यासाठी छान आहे. आपण भाजणीचे थालीपीठ बनवतो तसेच हे पण थालीपीठ सुद्धा आहे फक्त ह्यामध्ये वेगवेगळी पीठे वापरली आहे. ही पीठे आपल्या घरात नेहमी उपलब्ध असतात. अश्या प्रकारच्या थालीपीठाला धपाटे सुद्धा म्हणतात. रात्रीच्या जेवणात बनवायला सुद्धा छान आहे. रात्री जेवण आपण थोडे हलकेच करतो त्यामुळे अश्या प्रकारचे थालीपीठ बनवलेतर पोट सुद्धा भरते व ह्या मध्ये सर्व प्रकारची पीठे वापरली आहेत त्यामुळे हे पौस्टिक सुद्धा आहेत.
The English language recipe and preparation method of this Thalipeeth variety can be seen here – Healthy Mixed Flour Thalipeeth
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: ६ थालीपीठ बनतात
साहित्य:
१/२ कप ज्वारीचे पीठ
१/२ कप बाजरीचे पीठ
१/२ कप गव्हाचे पीठ
१/२ कप तांदळाचे पीठ
१/२ कप बेसन
१ मोठ्या आकाराचा कांदा (चिरून)
१/२ कप कोथंबीर (चिरून)
५ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून जिरे
१” आले तुकडा
१/२ टी स्पून हळद
२ टी स्पून तीळ
मीठ चवीने
तेल थालीपीठ भाजण्यासाठी
कृती:
कांदा, कोथंबीर बारीक चिरून घ्या. हिरवी मिरची, जिरे, आले वाटून घ्या. ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ व बेसन एकत्र करून घ्या. मग त्यामध्ये चिरलेला कांदा, कोथंबीर, हिरव्या मिरचीचे वाटण, तीळ, हळद, मीठ व पाणी लागेल तसे घेऊन पीठ मळून घ्या. पीठ मळून झाले की १० मिनिट पीठ तसेच झाकून ठेवा. पीठाचे एकसारखे ६ भाग करा.
नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवा. पिठाचा एक भाग घेऊन मध्यम आकाराच्या चपाती सारखा लाटून घ्या व तवा तापला की लाटलेले पीठ तव्यावर घालून दोनीही बाजूनी थोडे-थोडे तेल सोडून छान भाजून घ्या.
गरम गरम थालीपीठ दही, लोणच्या बरोबर सर्व्ह करा.