रतलामी शेव: रतलाम शेव ही मध्यप्रदेश मध्ये लोकप्रिय आहे. ही शेव दिवाळी फराळासाठी बनवायला छान आहे. कारण गोड पदार्था बरोबर ही तिखट शेव चांगली लागते. ही शेव बनवतांना मिरे, ओवा, जिरे, बडीशेप, दालचीनी, लवंग व सुंठ पावडर वापरली आहे. तसेच शेवेची टेस्ट निराळी लागते ते शेंदेलोण मीठ वारल्यामुळे व लिंबूरस वापरल्यामुळे. रतलाम शेव ही खमंग लागते.
The English language version of the Ratlami Sev recipe and its preparation method can be seen here- Spicy Ratlami Sev
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १०-१२ जणासाठी
साहित्य:
२ कप बेसन
२ टी स्पून लाल मिरची पावडर
७-८ मिरे
१/२ टी स्पून ओवा
१/४ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून बडीशेप
१” दालचीनी तुकडा
२ लवंग
१ टी स्पून सुंठ पावडर
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून शेंदेलोण मीठ
१/४ कप तेल (गरम)
एक चिमुट सोडा
१ टे स्पून लिंबूरस
मीठ चवीने
तेल शेव तळण्यासाठी
कृती:
तवा गरम करून त्यावर मिरे, ओवा, जिरे, बडीशेप, दालचीनी, लवंग थोडेसे गरम करून घेऊन मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटुन घ्या.
एका परातीत बेसन, लाल मिरची पावडर, हिंग, मीठ, शेंदेलोण मीठ, घालून चाळून घ्या. मग चाळलेल्या पीठामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घाला.
मिक्स करून वाटलेली मसाला पावडर, सुंठ पावडर, सोडा, लिंबूरस घालून मिक्स करून पाणी वापरून शेवेचे पीठ मळून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घ्या. मग सोरयामध्ये पीठ भरून थोडी मोठ्या भोकाची चकती लाऊन गरम तेलामध्ये शेव घाला. शेव दोनी बाजूनी मंद विस्तवावर तळून घ्या. तळलेली शेव पेपरवर ठेवून थंड झाल्यावर भरून ठेवा.