दगडी पोहे चिवडा: दगडी पोहे म्हणजे जाडे पोहे असतात व त्याचा चिवडा बनवण्या अगोदर ते तेलात तळून घेतात व चिवडा बनवतांना शेगदाणे, फुटाणा डाळ, सुके खोबरे, काजू, किसमिस, जरा जास्त प्रमाणात वापरले जातात. हा चिवडा महाराष्टात लोकप्रिय आहे. दिवाळी फराळा मध्ये हमखास बनवला जातो. दगडी पोहे बाजारात सहज उपलब्ध होतात.
The English language version of the Dagdi-Jade Pohe recipe and preparation method can be seen here – Jade Pohe Chivda
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १ किलो बनतो
साहित्य:
१/२ किलो दगडी पोहे
२ कप शेगदाणे
१ कप पंढरपूर डाळ
१ १/२ कप सुके खोबरे काप
१/२ कप काजू
१/२ कप किसमिस
१/२ कप साखर मीठ चवीने
१/२ लिटर तेल पोहे तळण्यासाठी
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१५-२० कडीपत्ता पाने
७-८ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून हळद
१/२ कप धने
१/४ कप जिरे
कृती:
प्रथम दगडी पोहे निवडून २ तास उन्हात ठेवा. शेगदाणे भाजून साले काढून घ्या. खोबऱ्याचे काप करून घ्या. हिरवी मिरचीचे तुकडे करून घ्या. धने-जिरे कुटून घ्या.
एका मध्यम आकाराच्या कढईमधे तेल गरम करून घ्या. पोहे तळण्यासाठी बाजारात मोठी चाळणी मिळते त्या चाळणीच्या सहायाने पोहे छान व लवकर तळून होतात. पोहे तळताना प्रथम विस्तव मोठा ठेवा पोहे घातल्यावर लगेच मंद करा. पोहे तळून झाल्यावर पेपरवर लगेच पसरवून ठेवा म्हणजे जास्तीचे तेल पेपर शोषून घेईल व चिवडा तेलकट होणार नाही.
पोहे तळून झाल्यावर तेल गाळून घ्या. व त्याच तेला मध्ये सोललेले शेगदाणे थोडेसे तळून घेऊन पेपरवर ठेवा. मग सुके खोबरे गुलाबी रंगावर तळून घ्या व बाजूला पेपरवर ठेवा. पंढरपुरी डाळ अगदी थोडीशी तळून घ्या नाहीतर कडक होईल व तीपण पेपरवर बाजूला ठेवा, काजू थोडेसे तळून पेपरवर ठेवा.
तळलेले पोहे, शेगदाणे, पंढरपुरी डाळ, सुके खोबरे, काजू, किसमिस व मीठ घालून एक सारखे मिक्स करून घ्या.
एका छोट्या कढईमधे फोडणी साठी तेल गरम करून त्यामध्ये हिरवी मिरची, कडीपत्ता, हळद, धने-जिरे पावडर घालून मिक्स करून तळलेल्या पोह्यावर हळू हळू घालून मिक्स करून घ्या. मग त्यावर पिठीसाखर घालून मिक्स करून घ्या. चिवडा थंड झाल्यावर प्लास्टिक पिशवीत भरून डब्यात भरून ठेवा.