शाही तुकडा किंवा डबल रोटी का मिठ्ठा: शाही तुकडा ही एक मोगलाई स्वीट डीश आहे. ही डीश हैदराबाद येथील लोकप्रिय डीश आहे. जेवणा नंतर डेझर्ट म्हणून द्यायला छान स्वीट डीश आहे. शाही तुकडा बनवतांना मी कमीतकमी वेळात कसा बनवता येईल पण जास्त गोड पण होता कामा नये ह्याची काळजी घेतली आहे. शाही तुकडा बनवतांना मी साखरेचा पाक बनवला नाही फक्त रबडी बनवून तळलेल्या ब्रेडवर घालून फ्रीजमध्ये थंड करायला ठेवा. अश्या प्रकारची डीश लहान व मोठे ह्यांना खूप आवडेल तसेच फार गोड सुद्धा होत नाही.
The English language version of this Hyderabadi dessert recipe and preparation method can be seen here – Delicious Shahi Tukda
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
तुकडा बनवण्यासाठी:
४ ब्रेड स्लाईस
१/२ कप तूप ब्रेड तळण्यासाठी
ड्राय फ्रुट सजावटीसाठी
रबडी बनवण्यासाठी:
१/२ लिटर दुध
१/२ कप साखर
२ टे स्पून खवा
१ टी स्पून वेलचीपूड
कृती:
रबडी बनवण्यासाठी:
जाड बुडाच्या भांड्यात दुध व साखर मिक्स करून आटवायला ठेवा, दुध इतके आटवले पाहिजे की निम्मे झाले पाहिजे. मग त्यामध्ये खवा व वेलचीपूड घालून मिक्स करून सारखे हलवत २-३ मिनिट दुध तसेच मंद विस्तवावर ठेवा. विस्तव बंद करून बाजूला थंड करायला ठेवा.
तुकडा बनवण्यासाठी:
ब्रेडच्या कडा कापून घ्या. एका ब्रेड स्लाईसचे दोन भाग करा.
कढईमधे तूप गरम करायला ठेवा. तूप गरम झाल्यावर ब्रेडचे तुकडे गुलाबी रंगावर तळून घ्या.
एका प्लेटमध्ये तळलेले ब्रेडचे तुकडे ठेऊन त्यावर रबडी घालून ड्रायफ्रुटने सजवा. मग फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवा.
शाही तुकडा किंवा डबल का मीठा थंड सर्व्ह करा.