खमंग पराठा पराठा: खमंग भरला पराठा हा एक जेवणामध्ये बनवण्यासाठी किंवा नाश्त्याला बनवण्यासाठी छान डीश आहे. लहान मुलांना डब्यात द्यायला चांगला आहे. खमंग पराठा हा महाराष्टात मराठवाडा येथे खूप लोकप्रिय आहे. हा पराठा बनवतांना त्यामध्ये सारण घातले आहे. सारणामध्ये चुरमुरे, शेंगदाणा कुट, तीळ, शेव वापरली आहे त्यामुळे पराठा खूप टेस्टी लागतो.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ पराठे
साहित्य:
आवरणासाठी: १ कप मैदा
१ कप गव्हाचे पीठ
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
तेल पराठा भाजण्यासाठी
सारणासाठी:
३ कप चुरमुरे
१/४ कप शेंगदाणे कुट
२ टे स्पून तीळ (थोडे भाजून)
१/४ कप बारीक साधी शेव
मसाल्याकरीता:
१ टे स्पून आले लसूण पेस्ट
२ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून धने=जिरे पावडर
१ टी स्पून चाट मसाला
१/४ कप कोथंबीर (बारीक चिरून)
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
कृती:
आवरणासाठी: गव्हाचे पीठ, मैदा, मीठ व तेल एकत्र करून थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊन बाजूला ठेवा.
सारणासाठी: एका बाऊलमध्ये मुरमुरे घेऊन त्यामध्ये एक कप पाणी घालून एकत्र करून घेऊन बाजूला ठेवा.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, आले-लसूण पेस्ट घालून त्यामध्ये भिजवलेले मुरमुरे घालून लाल मिरची पावडर, चाट मसाला, धने=जिरे पावडर, शेंगदाणा कुट, भाजलेले तीळ, घालून कोथंबीर घालून मिक्स करा. मग त्यामध्ये शेव घालून मिक्स करून घेऊन सारण तयार करून घ्या. मिश्रणाचे एकसारखे चार भाग बनवून घ्या.
मळलेल्या पीठाचे एकसारखे चार गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन पुरीच्या आकाराचा लाटून घेऊन त्यामध्ये मिश्रणाचा एक भाग ठेऊन पुरी बंद करा व बंद केलेली पुरी पराठ्या प्रमाणे लाटून घ्या.
नॉन स्टिक तवा गरम करून घ्या. तव्यावर बनवलेला पराठा दोनी बाजूनी तेल घालून चांगला खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे बाकीचे पराठे बनवून घ्या.
गरम गरम पराठे टोमाटो सॉस किंवा दही बरोबर सर्व्ह करा.