शान-ए-मुर्ग: शान-ए-मुर्ग ही एक शाही नाश्त्यासाठी किंवा पार्टीला जेवणाच्या बनवण्यासाठी छान आहेत. शान-ए-मुर्ग बनवतांना प्रथम चिकनचे तुकडे आले-लसूण, लिंबूरस, मीठ लाऊन भिजवून ठेवले मग त्यामध्ये पनीर-अननसाचे सारण भरून घेतले व अंडे-मैदा-कॉर्नफ्लोअर च्या मिश्रणात घोळून छान गुलाबी रंगावर तळून घेतले.
बनवण्यासाठी वेळ:६० मिनिट
वाढणी: ८ पिसेस बनतात
साहित्य:
८ चिकनचे तुकडे
तेल चिकनचे मसाला भरलेले तुकडे तळण्यासाठी
मसाला मुरवण्यासाठी:
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
२ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
१ मोठे लिंबूरस
भरण्यासाठी सारण:
२५० ग्राम पनीर
१ टे स्पून धने
२ हिरव्या मिरच्या
१ कप कोथंबीर (चिरून)
२ अननस चकत्या
१०-१२ काजू
१ टी स्पून शहाजिरे
मीठ चवीने
पीठ भिजवण्यासाठी:
२ अंडी
१/२ कप कॉर्नफ्लोर
१/२ कप मका पीठ
१/२ कप मैदा
मीठ चवीने
कृती:
चिकनचे तुकडे धुवून घ्या व चिकनच्या तुकड्यांना सुरीने चिर घ्या. (म्हणजे आपल्याला त्या जागी सारण भरता येईल)
एक भांड्यात चिकनचे चिरा मारलेले तुकडे ठेवा. मग त्या तुकड्यांना आले-लसूण पेस्ट, लाल मिरची पावडर, लिंबूरस व मीठ चोळून अर्धातास झाकून बाजूला ठेवा.
सारण बनवण्यासाठी: एका भांड्यात पनीर कुस्करून घ्या, चिरलेली कोथंबीर, हिरवी मिरची, अननसाचे तुकडे बारीक चिरलेले, काजूचे बारीक तुकडे, लाल मिरची पावडर, मीठ मिक्स करून चिकन मँरीनेट करायला ठेवलेल्या तुकड्यांच्या चिरा दिलेल्या जागी भरावे. मग चिकनचे तुकडे फ्रीजमध्ये १५-२० मिनिट तसेच ठेवा.
पीठ भिजवण्यासाठी: एका भांड्यात अंडी फोडून फेटून त्यामध्ये कॉर्नफ्लोअर, मैदा, मक्याचे पीठ, मीठ थोडे पाणी घालून भिजवून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून घ्या. चिकनचे तुकडे अंड्याच्या मिश्रणात घोळून गरम तेलामध्ये छान गुलाबी रंगावर तळून घ्या. मग तळलेले तुकडे ओव्हनमध्ये १०-१२ मिनिट भाजून घ्या.
सलाड बरोबर गरम गरम सर्व्ह करा.