शाही काले मोती बिर्याणी: शाही काले मोती बिर्याणी ही उत्तर प्रदेशातील लोकप्रिय डीश आहे. शाही काले मोती बिर्याणी बनवतांना काबुली चणे वापरले आहेत म्हणून त्याला काले मोती म्हंटले आहे. आपण नेहमी भाज्या घालून किंवा चिकन मटन वापरून बिर्याणी बनवतो. पण अश्या प्रकारच्या बिर्याणी मध्ये फक्त गरम मसाला व काबुली चणे वापरले आहेत त्यामुळे टेस्ट खूप छान येते व चवपण छान लागते.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
बिर्याणीसाठी भात:
२ कप बासमती तांदूळ
गरम मसाला अख्खा:
१ मसाला वेलची ४ लवंग १” दालचीनी तुकडा १ तमाल पत्र
२ कप पाणी
१ १/२ कप दुध
मीठ चवीने
काले मोती बनवण्यासाठी:
१ कप काबुली चणे
मीठ चवीने
एक चिमुट खायचा सोडा
१ टे स्पून तेल
१ टे स्पून आले-लसूण पेस्ट
२ टी स्पून लाल मिरची पूड
१/२ टी स्पून हळद
१ टी स्पून गरम मसाला
१/२ कप दही
१ मोठा टोमाटो
२ हिरव्या मिरच्या (बिया काढून)
सजावटी साठी:
१/४ कप कोथंबीर (चिरून)
१/४ कप पुदिना पाने
१ टी स्पून आले (पातळ उभे चिरून)
१ छोटा टोमाटो (चिरून)
१ मोठा कांदा (उभा पातळ चिरून तेलात छान कुरकुरीत तळून)
१/२ कप दुध (थोडेसे केसर घालून)
७-८ काजू बदाम तळून घ्या
कृती:
काबुली चणे आधल्या दिवशी रात्री भिजत घालून सकाळी मीठ, सोडा व चणे बुडतील एव्ह्डे पाणी घालून शिजवून घ्या (चणे अगदी खूप शिजवू नये नाहीतर चव बरोबर लागत नाही. बोटानी थोडे दाबले जातील एव्ह्डे शिजवून घ्या)
कांदा, टोमाटो, कोथंबीर, पुदिना चिरून घ्या. एक मोठा कांदा उभा पातळ चिरून तेलामध्ये कुरकुरीत तळून घ्या.
तांदूळ धुवून अर्धा तास बाजूला ठेवा. कुकर मध्ये पाणी व दुध गरम करून त्यामध्ये अक्खा गरम मसाला घालून ढवळून घ्या. मग त्यामध्ये धुतलेले तांदूळ व चवीने मीठ घालून कुकरचे झाकण लाऊन घेऊन दोन शिट्या काढा. कुकर उघडल्यावर झाकण काढून भात थंड करायला ठेवा. भात मोकळा झाला पाहिजे.
एक नॉन स्टिक भांड्यामधे तेल गरम करून आले-लसूण पेस्ट घालून थोडी परतून, हळद, लाल मिरची पावडर, घालून त्यामध्ये थोडेसे पाणी घालून उकळी आली की लगेच दही, टोमाटो, हिरवी मिरची घालून मिक्स करून एक उकळी आली की उकडलेले काबुली चणे व १ कप पाणी घालून उकळी आणून घट्टसर रस्सा बनवून घ्या. रस्सा घट्ट झाला की समजावे आपले काले मोती तयार झाले.
भांडे विस्तवावरून खाली उतरवून शिजवलेल्या काले मोतीवर चिरलेली कोथंबीर, पुदिना, आले, टोमाटो , निम्मा तळलेला कांदा पसरावा मग त्यावर शिजवलेला मोकळा भात पसरवून घ्या व वरतून १/२ कप केशर दुधाचा हबका मारा. मग भांड्यावर झाकण ठेवून झाकणावर जड वजन ठेवून मंद विस्तवावर १०-१२ मिनिट शिजू द्या.
शाही काले मोती बिर्याणी सर्व्ह करतांना वरतून चिरलेली कोथंबीर, तळलेला कांदा व तळलेले काजू-बदाम घालून सर्व्ह करा.