घरच्या घरी मीयोनीज सॉस कसा बनवायचा: मीयोनीज सॉस हा रशियन सलाड बनवण्यासाठी किंवा बर्गर बनवण्यासाठी उपयोगी आहे. तसेच मीयोनीज सॉसमध्ये वेगवेगळी फळे कापून घालून मिक्स करून सुद्धा छान लागते. ह्या मीयोनीज सॉसची पध्दत माझी मैत्रिण डॉक्टर चंदा साळगावकर ह्यानी मला शिकवली आहे. ह्या पद्धतीने बनवलेला सॉस चवीस्ट लागतो. मियोनीज सॉस घरी बनवायला अगदी सोपा आहे व तो आठ दिवस फ्रीजमध्ये अगदी छान रहातो.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: 2 कप सॉस बनतो
साहित्य:
2 कप दुध
2 अंडे (फक्त पिवळे बलक)
4 टी स्पून कॉर्नफ्लोर
१ १/२ टी स्पून मोहरी पावडर
१ १/२ टी स्पून मीठ
४ टे स्पून साखर
२ टी स्पून तेल
१ टे पांढरे व्हेनीगर
कृती:
दुध गरम करून गार करून घ्या. एका बाऊलमध्ये अंडे फोडून अंड्यातील फक्त पिवळे बलक घ्या. त्यामध्ये साखर, मीठ, मोहरी पावडर, तेल घालून चांगले मिक्स करून घेऊन त्यामध्ये कॉर्नफ्लोर घालून मिक्स करून थोडे थोडे दुध मिक्स करून घ्या. दुधामध्ये कॉर्नफ्लोरची गुठळी होता कामा नये.
एका जाड बुडाच्या भांड्यात हे मिश्रण ओतुन लहान विस्तवावर शिजवायला ठेवा. मिश्रण चमच्याने सारखे हलवत रहा तसेच शिजवताना मिश्रणामध्ये गुठळी होता कामा नये. मिश्रण घट्ट झाली विस्तवावरून भांडे खाली उतरवून घ्या. दोन मिनिटांनी त्यामध्ये पांढरे व्हेनीगर घालून परत मिक्स करा.
मियोनीज सॉस तयार झाला.