सोललेल्या हरभऱ्याची कोकणी आमटी: कोकण म्हंटल की आपल्या डोळ्या समोर मासे व माशाचे पदार्थ येतात. महाराष्ट्रातील कोकण ह्या भागात आमटी विविध प्रकारची बनवतात व त्या छान खमंग टेस्टी असतात. तसेच सारस्वत लोक सुद्धा अश्या प्रकारच्या विविध आमट्या बनवतात. हरभऱ्याची आमटी बनवतात प्रथम ७-८ तास हरभरे भिजत घालून त्यातील पाणी काढून परत ७-८ तास तसेच झाकून ठेवले की त्याला छान मोड येतात. मग हे मोड आलेले हरभरे परत १०-१५ मिनिट कोमट पाण्यात भिजत ठेऊन, मोड आलेल्या हरभऱ्याची साले काढून घ्या. मग त्याची आमटी बनवा. ही आमटी गरम गरम भाता बरोबर सर्व्ह करा. मग बघा कशी अप्रतीम लागते केलेले सगळे कष्ट विसरून जाल.
The English language version of the same Harbara Amti recipe and its preparation method can be seen here – Spicy Kala Chana Curry
बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप सुके हरभरे
१ छोटा बटाटा
८-१० काजू
१/४ कप कोथंबीर (चिरून)
२ आमसूल
मीठ चवीने
मसाल्या करीता:
१/२ टे स्पून तेल
१ छोटा कांदा (चिरून)
७-८ लसूण पाकळ्या
१/२ कप ओला नारळ (खोऊन)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
२ लवंग
१/२” दालचीनी तुकडा
४ मिरे
२ हिरवे वेलदोडे
१/२ टी स्पून खसखस
१/२ टी स्पून धने
१/२ टी स्पून शहाजिरे
१/२ टी स्पून मोहरी
१/२ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
छोटे तमलपत्र
फोडणी करीता:
१ टी स्पून तूप
१ टे स्पून कांदा (चिरून)
१/२ टी स्पून हळद
कृती:
प्रथम सुके हरभरे पाण्यात ७-८ तास भिजत ठेवा. मग त्यातील पाणी काढून ७-८ तास झाकून ठेवा. त्याला चांगले मोड आलेकी कोमट पाण्यात १० मिनिट भिजत ठेऊन मोड आलेले हरभरे सोलून घ्या.
कुकर लावतांना भाता बरोबर सोललेले हरभरे पण शिजवून घ्या. हरभरे शिजले की हातानी अगदी थोडेसे कुस्करून घ्या म्हणजे आमटी छान मिळून येते. कांदा चिरून घ्या. बटाटा सोलून चौकोनी तुकडे करा. कोथंबीर धुवून चिरून घ्या.
कुकर होई परंत मसाला बनवून घ्या.
मसाला बनवण्यासाठी: एका कढईमधे तेल गरम करून चिरलेला कांदा व लसूण घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये खोवलेला नारळ घालून थोडा परतून घ्या. नारळ परतून झाला की त्यामध्ये लवंग, दालचीनी, मिरे. वेलदोडे, खसखस, मोहरी, जिरे, धने, शहाजिरे, हिंग, छोटे तमलपत्र व लाल मिरची पावडर घालून एक मिनिट परतून घ्या. मसाला थंड झाल्यावर थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक वाटुन घ्या.
एका कढईमधे तूप गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, बटाटा, हळद घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये शिजवलेला हरभरा, काजू, मीठ घालून वाटलेला मसला व पाणी घालून ५-७ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. म्हणजे मसाला पण छान शिजेल. आमटीला चांगली उकळी आली की आमसुल घालून आमटी खाली उतरवून घ्या. मग चिरलेला कोथंबीर घालून मिक्स करा.
गरम गरम आमटी भाता बरोबर सर्व्ह करा.