स्मार्ट टिप्स बिर्याणी बनवण्यासाठी: बिर्याणी म्हंटल की आपल्या तोंडाला नकळतच पाणी येते मग ती व्हेजीटेबल, चिकन किंवा मटणाची असो. आपली बिर्याणी छान व्हावी म्हणून काही टिप्स आहेत.
भातासाठी: बिर्याणी साठी चांगला बासमती जुना तांदूळ वापरावा.
करण्याच्या अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास ठेवावे. एक कप तांदळासाठी ४ कप पाणी घ्यावे त्यामध्ये १/४ टी स्पून तेल घालावे म्हणजे भात मोकळा होतो.
थोडे मीठ व १/४ टी स्पून लिंबू रस किंवा व्हेनिगर घालावे म्हणजे भाताला चकाकी येते व पांढराशुभ्र दिसतो व मोकळा होतो.
भात ३/४ शिजवून घ्यावा म्हणजे बिर्याणी चिकट होत नाही.
व्हेज बिर्याणी करतांना भाज्या अर्धवट शिजवून घ्या. नॉन व्हेज बिर्याणी करतांना चिकन व मटन पण शिजवून घ्या.
नेहमी साजूक तूप वापरावे नाहीतर निम्मे साजूक व निम्मे डालडा वापरावे. तूप व मसाला जरा जास्तच लागतो.
हिरवे वेलदोडे वापरताना ते सोलून त्याचे दाणेच वापर ते अख्खे टाकू नये कारण की त्यावर खूप पेस्टीसाईड मारलेले असतात.
बिर्याणी लावतांना बुडाला उकडलेल्या बटाट्याच्या चकत्या ठेवाव्या म्हणजे भात खाली लागणार नाही.
बिर्याणी झणझणीत हवी असेल तर मसाला वाटतांना हिरवी मिरची व पुदिना घालावा.
मटार ताजे वापरून तेलाचा हात लावून मग उकडावे.
कांदा तळून झाल्यावर चिमूटभर साखर भुरभुरावी म्हणजे कांदा बराच वेळ कुरकुरीत रहातो.