जेवतांना ताट कसे वाढावे: आपल्या देशामध्ये विविध प्रांत आहेत त्या प्रांता नुसार तेथील रहिवाशाचे राहणीमान व आहार ठरलेला असतो.
उत्तरप्रदेश म्हंटले की विविध प्रकारचे चाट, परोठे, चना भटुरा, कचोरी वगैरे. गुजरात म्हंटले की विविध प्रकारचे ढोकळे , दक्षिण भाग म्हंटले की इडली, डोसा, सांबर. बंगाल म्हंटले की रसगुल्ले, संदेश. पण महाराष्ट्र म्हंटले की नाना विविध प्रकारचे पदार्थ बनवले जातात.
महाराष्टमध्ये वरण-भात, पोळी-भाजी, चटणी, कोशंबीर, लोणचे, ताक किंवा दही असा पौस्टिक आहार असतो. महाराष्ट्रातील कोल्हापूर, खानदेश, विदर्भ सोलापूर येथे झणझणीत पदार्थ बनवले जातात. तसेच कोकण ह्या भागामध्ये नारळ, मासे, आंब्याचे, फणसाचे, तांदळाचे नानाविध पदार्थ बनवले जातात. मुंबई म्हंटले की वडापाव ई. महाराष्ट्रातील मराठी लोक सणावाराच्या दिवशी पुरणपोळी, कटाची आमटी, भजी व मसाले भात अगदी आवर्जून करतात. मराठी महिलांचा ह्या मध्ये हातकंडा आहे असे म्हणायला काही हरकत नाही.
महाराष्टात संक्रांतीला तिळाची पोळी, होळीला पुरणपोळी, पाडव्याला श्रीखंड-पुरी, श्रावण महिन्यात तर खीर -पुरी, शिरा, हलवा, नागपंचमीला पुरणाचे दिंड, नारळी पौर्णिमेला नारळाचे पदार्थ, गणपती उत्सवमध्ये उकडीचे मोदक व महत्वाचे दिवाळी मध्ये वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवतात.
महाराष्ट्रात मध्ये अजून एक छान पद्धत आहे ते म्हणजे जेवतांना शात्रशुध्द पद्धतीने ताट कसे वाढायचे. ताट वाढताना काही गोष्टी लक्षात घेऊन वाढल्यातर जेवण करणारा सुद्धा अगदी खुश होऊन जेवतो व दिसायला सुद्धा आकर्षक दिसते.
आपल्या इथे पूर्वीच्या काळी जेवणाला सुरवात करण्या आगोदर “वदनी कवल घेता नाम घ्या श्री हरीचे” हे म्हणून परमेश्वराला नमस्कार करून मग जेवणास सुरवात करायचे. त्यामुळे जेवण सुद्धा शांतपणे होते.
पण आता धकाधकीच्या जीवनात प्रतेक जण कामामध्ये व्यस्त आहे. घरातील स्त्रिया सुद्धा तारेवरची कसरत करून घर, संसार व ऑफिस संभाळून आपल्या संसाराला हातभार लावत आहेत. तरी सुद्धा आपल्याकडे सणावाराला ह्या पद्धती पाळल्या जातात. त्यामुळे आजच्या पिढीला सुद्धा ह्या पद्धती माहिती होतात.