पारंपारिक आंब्याचे लोणचे: एप्रिल व मे महिना आला की आंब्याचा सीझन चालू होतो. नंतर जून महिन्यामध्ये लोणच्याच्या कैऱ्या बाजारात यायला लागतात. तेव्हा अश्या प्रकारचे लोणचे घालावे. लोणचे तयार करतांना कैऱ्या ताज्या, कडक व पांढऱ्या बाठाच्या घ्याव्यात. म्हणजे लोणचे चांगले चवी स्ट होते व वर्षभर चांगले टिकते. असे आंब्याचे लोणचे फार पूर्वी पासून घालतात.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १ किलो ग्राम
साहित्य:
५ मोठ्या आकाराच्या कैऱ्या किंवा १ किलो कैऱ्या (पांढऱ्या ताज्या)
१ वाटी मीठ
१ वाटी मोहरीची डाळ
१/२ वाटी लाल मिरची पावडर
१/४ वाटी हळद
४ टी स्पून हिंग
२ टी स्पून मेथी दाणे
१ १/२ वाटी तेल
कृती:
प्रथम कैऱ्या धुवून. पुसून कोरड्या कराव्यात. मग त्याचे तुकडे करून घेऊन त्याला १/४ कप तेल व १ टे स्पून हळद लाऊन थोडा वेळ झाकून बाजूला ठेवावे.
कढई मध्ये एक टी स्पून तेल गरम करून मेथी दाणे व हिंग थोडेसे परतून घेऊन त्याची पूड करावी. मोहरीची डाळ थोडी बारीक करून घ्यावी. मग मेथी-हिंगपूड, मोहरीची कुटलेली डाळ, मीठ, लाल मिरची पावडर मिक्स करून लोणच्याचा मसाला बनवावा.
कढईमधे राहिलेले तेल गरम करून मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. विस्तव बंद करून मग त्यामध्ये हळद घालून मिक्स करून थंड करायला ठेवावे. थड झालेल्या फोडणी मध्ये तयार केलेला लोणच्याला मसाला घालून मिक्स करून कैरीच्या फोडी घालून मिक्स करून घ्यावे.
ज्या बरणीमध्ये लोणचे ठेवायचे आहे ती चांगली स्वच्छ कोरडी करून घ्या. प्रथम बरणीत थोडेसे मीठ घालून मग लोणचे भरून बरणीचे झाकण घट्ट बंद करून २-३ दिवस तसेच ठेवावे. तिसऱ्या दिवशी लोणचे हलवून घ्या. जर तेल कमी वाटले तर परत थोडे तेल गरम करून थंड करावे व लोणच्यामध्ये घालावे. फोडी पूर्ण बुडतील एव्ह्डे तेल घालावे. अश्या प्रकारचे लोणचे एक वर्ष चांगले टिकते.