मुगाच्या डाळीच्या चकल्या: मुगाच्या डाळीच्या चकल्या चवीस्ट लागतात. चकल्या बनवतांना मुगाची डाळ धुऊन शिजवून घ्यावी तसेच मैदा वाफवून घ्यावा. ह्या चकल्या बनवायला सोप्या आहेत तसेच झटपट होणाऱ्या आहेत.
The English language version of this Chakli recipe can be seen here – Tasty Moong Dal Chakli
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: ३० चकल्या बनतात
साहित्य:
१ वाटी मुगाची डाळ
१/४ टी स्पून हळद
१/२ टी स्पून हिंग
२ टी स्पून तीळ
१ टी स्पून ओवा
१ टी स्पून लाल मिरची पूड
२ वाट्या मैदा
मीठ चवीने
तळण्यासाठी तेल
जरूर पडल्यास तांदळाचे पीठ
कृती:
मुगाची डाळ धुऊन दोन वाट्या पाणी, हळद, हिंग घालून कुकरच्या भांड्यात ठेवावी. त्याच बरोबर एका पातळ कापडामध्ये मैदा सैलसर बांधून डाळी वरच्या ताटलीवर ठेवून १२-१५ मिनिट कुकरमध्ये शिजवून घ्यावे. कुकर उघडल्यावर डाळीमध्ये ओवा, तीळ, लाल मिरची पूड व मीठ चांगले घोटून घ्यावे. मैद्याच्या गुठळ्या फोडून मैदा चाळून घ्यावा.
उकडलेली मुगाची डाळ व मैदा मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्यावे. जर पीठ सैल वाटले तर त्यामध्ये लागेल तेव्हडे तांदळाचे पीठ घालून परत पीठ चांगले मळून घ्यावे.
एक कढई मध्ये तेल गरम करायला ठेवा. पिठाचा एक गोळा घेऊन चकली सोरयामध्ये ठेवून एका प्लास्टिक पेपरवर चकल्या बनवून घ्या. तेल चांगले तापले की चकल्या तळून घ्या.
चकल्या थंड झाल्यावर प्लास्टिक पिशवी मध्ये ठेवून घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवा.