पावभाजी पराठा: पावभाजी पराठा ही एक नाश्त्याला किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान डीश आहे. आपण घरी पावभाजी बनवतो. पण कधी कधी भाजी उरते मग त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. त्यावेळी अश्या प्रकारचा पराठा बनवा मुलांना व घरातील सर्व मंडळींना खूप आवडेल तसेच आपली भाजी वाया जाणार नाही व त्याचा चांगला उपयोग होईल. तसेच पावभाजी पराठा चवीला छान खमंग लागतो.
The English language version of the same Paratha recipe can be seen here – Tasty Pav-Bhaji Paratha
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४-६ पराठा
साहित्य:
२ कप पावभाजीची भाजी – बनवण्याची कृती येथे बघा
२ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून बेसन
मीठ चवीने
तेल पराठे भाजण्यासाठी
कृती: पावभाजीची भाजी एका बाऊलमध्ये घेऊन त्यामध्ये गव्हाचे पीठ, बेसन, मीठ घालून पीठ घट्ट मळून घेऊन १०-१५ मिनिट बाजूला ठेवा. मग त्याचे एक सारखे ४-६ गोळे बनवा.
नॉनस्टिक तवा गरम करून घ्या. पिठाचा एक गोळा घेऊन लाटून घेऊन नॉन स्टिक तव्यावर दोनी बाजूनी तेल घालून छान खरपूस भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून घ्या. गरम गरम पराठे बटर व टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
टीप: हे पराठे बनवतांना पावभाजीची भाजी उरलेली वापरली आहे व त्यामध्ये जेव्हडे बसेल तेव्हडे गव्हाचे पीठ वापरले आहे. गरज पडल्यास गव्हाचे पीठ अजून वापरू शकता.
मुलांना शाळेत जातांना फॉईल पेपरमध्ये गुंडाळून द्या. म्हणजे छान फ्रेश राहतील.