मिसळ पाव: मिसळ पाव ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय पारंपारिक डीश आहे. मिसळ पाव नाश्त्याला किंवा जेवणात सुद्धा बनवायला छान आहे तसेच कीटी पार्टीला किंवा मुलांच्या वाढदिवसच्या पार्टीलापण बनवायला चांगली आहे. मिसळ पाव ही डीश मोड आलेल्या मटकी पासून व फरसाण वापरून बनवतात. ह्याचा रस्सा थोडा पातळ असतो म्हणजे ब्रेड बरोबर छान खाता येतो.
The English language version on this recipe can be seen here – Misal Pav
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४-५ जणासाठी
साहित्य:
२ कप मोड आलेली मटकी
२ मोठे कांदे (चिरून)
१ मोठा टोमाटो (चिरून)
१ लिंबू (रस काढून)
७-८ लसूण पाकळ्या
१” आले तुकडा
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१ टी स्पून गरम मसाला
१/४ कप ओला नारळ (मिक्सरमध्ये बारीक वाटून)
१/२ टी स्पून हळद
१ कप कोथंबीर (चिरून)
२५० ग्राम फरसाण
मीठ चवीला
४०० ग्राम ब्रेड स्लाईस
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून हिंग
७-८ कडीपत्ता पाने
कृती: मोड आलेली मटकी धुऊन घेऊन कुकरमध्ये एक शिट्टी काढून घ्या.आले-लसूण वाटून घ्या.
कढईमधे तेल गरम करून घेऊन मोहरी, जिरे, हिंग कडीपत्ता घालून १ चिरलेला कांदा घालून थोडा परतून त्यामध्ये आले-लसूण पेस्ट घालून थोडी परतून त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, वाटलेला नारळ, मीठ घालून २ कप पाणी घालून मग त्यामध्ये शिजवलेला मटकी घालून मिक्स करून घ्या. मग कढईवर झाकण ठेवून ५-७ मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या. मटकी शिजली की वरतून कोथंबीर व लिंबू रस घालून मिक्स करा.
गरम गरम मिसळ पाव सर्व्ह करा. मटकीचा रस्सा एका बाऊलमध्ये देऊन त्याबरोबर कांदा, टोमाटो, कोथंबीर, फरसाण व ब्रेड सर्व्ह करा.