ड्रायफ्रुट करंजी: ड्रायफ्रुटची किंवा सुका मेवाची करंजी ही दिवाळी फराळासाठी एक आकर्षक करंजी वाटेल. आपण सुक्या खोबऱ्याची किंवा ओल्या नारळाची करंजी बनवतो अजून बऱ्याच प्रकारच्या करंज्या बनवता येतात, तसेच सुकामेवा वापरून सुद्धा छान करंजी बनवता येते. अश्या प्रकारची करंजी बनवतांना सुके खोबरे किसून, बेदाणे, काजू, बदाम, चारोळी, पिठीसाखर वापरली आहे.
The English language version of the same Karanji can be seen here – Sukha Mewa Karanji
करंजी ह्या पदार्थाला फराळामध्ये मानाचे स्थान आहे. करंजी शिवाय आपला फराळ पूर्ण होत नाही.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २५-३० करंज्या बनतात
साहित्य:
आवरणासाठी:
३ कप मैदा
१/४ कप तूप (गरम)
१ कप दुध
मीठ चवीने
सारणासाठी:
१ कप सुके खोबरे (किसून)
१/४ कप बेदाणे (किसमिस)
१ टे स्पून खसखस
१/४ कप काजू
१/४ कप बदाम
१/४ कप चारोळी
१/४ कप पिस्ता
१ टी स्पून वेलचीपूड
१/४ टी स्पून जायफळ पूड
१ १/४ कप पिठी साखर
तूप करंजी तळण्यासाठी
साहित्य: आवरणासाठी: मैदा चाळून घ्या त्यामध्ये मीठ, गरम तूप घालून चांगले मिक्स करून घेऊन त्यामध्ये दुध व थोडे पाणी घालून पीठ मध्यम मळून घेऊन १५-२० मिनिट बाजूला ठेवा. (फार सैल किंवा फार घट्ट मळता कामा नये)
सारणासाठी: सुके खोबरे घेऊन फक्त पांढरा भाग किसून थोडे भाजून घ्या. खसखस भाजून कुटून घ्या. बदाम, काजू, पिस्ता, चारोळी जाडसर कुटून घ्या. मग भाजलेले खोबरे, कुटलेली खसखस, जाडसर कुटलेला सुका मेवा, पिठीसाखर, वेलचीपूड, जायफळ पूड घालून मिक्स करून मिश्रण तयार करा.
करंजी बनवण्यासाठी: मळलेल्या पीठाचे एक सारखे २५-३० गोळे बनवून घ्या. एक गोळा घेऊन पुरीच्या आकाराचा लाटून घेऊन त्यामध्ये एक टे स्पून स्पून सारण भरून पुरी मुडपून घेऊन करंजीच्या कटरनी कापून घ्या. अश्या प्रकारे सर्व करंज्या बनवून घ्या.
कढईमधे तूप गरम करून घेऊन करंज्या गुलाबी रंगावर तळून घ्या. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवा.