कँपरेसी सलाड विथ पेस्तो सॉस: इटालीयन लोकांची लोकप्रिय सलाड डीश आहे. बनवायला सोपे व झटपट होणारी आहे. ह्यामध्ये लाल टोमाटोच्या चकत्या कापून, चीजच्यापण चकत्या कापून वरतून पेस्तो सॉस घातला आहे त्यामुळे ह्याची चव अगदी वेगळीच लागते. पेस्तो सॉस कसा बनवायचा ते पण खाली दिलेले आहे. पेस्तो सॉस बनवतांना पाईन नट्स वापरले आहे त्यामुळे चव छान येते व पाईन नट्स हे आपल्या तबेतीला हितावह आहेत.
बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
२ मोठे लाल ताजे टोमाटो
१०० ग्राम चीज
१/४ कप तुळशीची पाने
२ टे स्पून पेस्तो सॉस
१ टे स्पून ऑलीव्ह ऑईल
मीठ व मिरे पावडर चवीने
पेस्तो सॉस:
१/२ कप बेसिल पाने
१ कप पाईन नट्स
१ कप चीज (किसून)
१/२ कप ऑलीव्ह ऑईल
१ टी स्पून लिंबूरस (जर सॉस घट्ट झालातर थोडे ऑलीव्ह ऑईल अजून मिक्स करा.)
कृती: पेस्तो सॉस बनवण्यासाठी: बेसिल पाने, पाईन नट्स, चीज, ऑलीव्ह ऑईल मिक्स करून मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्या. मग त्यामध्ये लिंबूरस घालून मिक्स करून एका बाऊलमध्ये काढून घ्या.
सलाड: लाल टोमाटोच्या उभ्या चकत्या करून घ्या. त्यावर थोडेसे लिंबूरस, मीठ व मिरे पावडर घालून मिक्स करून घ्या. चीजच्या गोल-गोल चकत्या कापून घ्या. एका सर्व्हिंग डीश मध्ये एक टोमाटोची चकती, एक चीजची चकती अश्या प्रकारे लाऊन घ्या. टोमाटो व चीजच्या चकत्या लावून झाल्यावर वरतून तुळशीची पाने व पेस्तो सॉस घालून सजवा व सर्व्ह करा.