उकडीचे रवा-नारळाचे लाडू: सुजीके लड्डू दिवाळी फराळासाठी. उकडीचे रवा-नारळाचे लाडू हा एक लाडूचा नवीन प्रकार आहे. हे लाडू स्वादीस्ट व छान मऊसर लागतात. आपण रवा-नारळाचे पाक बनवून लाडू बनवतो. अश्या प्रकारचे लाडू बनवतांना रवा व नारळ साजूक तुपामध्ये मंद विस्तवावर भाजून घेतले आहे व कुकरमध्ये बंद डब्यात ठेवून तीन शिट्या काढून घेऊन थंड झाल्यावर पिठी साखर घालून लाडू बनवले आहेत. ह्या मध्ये वेलचीपूड न वापरता रोझ ईसेन्स वापरला आहे त्यामुळे चव व सुगंध खूप छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: १८ लाडू बनतात
साहित्य:
२ कप बारीक रवा
१ कप नारळ (खोऊन)
१ कप दुध
१ १/२ कप पिठीसाखर
१/४ कप साजूक तूप
थोडे बेदाणे
१/४ टी स्पून रोझ ईसेन्स
कृती: एका मध्यम आकाराच्या कढई मध्ये तूप गरम करून रवा मंद विस्तवावर भाजून घ्या. रवा भाजून झाल्यावर त्यामध्ये खोवलेला नारळ घालून परत ५-७ मिनिट मंद विस्तवावर नारळ व रवा भाजून घ्या. (रवा चांगला भाजला गेला पाहिजे पण जास्त गुलाबी रंग येत कामा नये.)
एका घट्ट झाकणाच्या डब्यात भाजलेले नारळ-रव्याचे मिश्रण, बेदाणे (किसमिस), दुधाचा हबका मारून डब्बा कुकरमध्ये ठेवावा व कुकरचे झाकण लावून ३-४ शिट्या काढाव्यात. कुकर थंड झाल्यावर डब्बा काढून आतील मिश्रण परातीत काढून थोडे थंड झाल्यावर त्यामध्ये पिठी साखर, रोझ ईसेन्स घालून मिक्स करून थोडे मळून घ्यावे. मग त्याचे मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यावेत.
लाडू वळून झाल्यावर मग स्टीलच्या हवा बंद डब्यात भरून ठेवावे.