बटाटा साबुदाणा पापड्या: बटाटा साबुदाणा पापड्या ह्या उपवासासाठी आहेत. ह्या पापड्या चवीस्ट लागतात. साबुदाणा बटाटा पापडी बनवतांना उकडलेला बटाटा, हिरवी मिरची, जिरे वापरले आहेत.
अश्या प्रकारच्या पापड्या बनवायला अगदी सोप्या व झटपट होणाऱ्या आहेत. बटाटा साबुदाणा पापड्या ह्या रंगीत सुद्धा बनवता येतात. महाराष्ट्रात मुलीच्या लग्नात रुखवत द्यायची पध्दत पूर्वी पासून चालू आहे. रुखवतात ठेवायला अश्या रंगीत पापड्या छान दिसतील.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ६०-७० पापड्या बनतात
साहित्य:
२ कप साबुदाणा
५ कप पाणी
४ मध्यम आकाराचे बटाटे
४ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून जिरे
मीठ चवीने
रंग आपल्या आवडी नुसार
कृती:
रात्री साबुदाणा धऊन घ्या मग त्यामध्ये साबुदाणा बुडेल एव्ह्डे पाणी घालून झाकून ठेवा.
दुसऱ्या दिवशी प्रथम बटाट्याची साले काढून ५ मिनिट उकडून घेऊन गरम असतांना किसून घ्या. हिरवी मिरची बारीक चिरून घ्या.
एका जाड बुडाच्या स्टीलच्या भांड्यात ५ कप पाणी गरम करायला ठेवा. पाणी चांगले गरम झाले की त्यामध्ये भिजवलेला साबुदाणा घालून मिक्स करून थोडे घट्ट व्हायला लागले की त्यामध्ये किसलेला बटाटा, जिरे, मीठ, हिरवी मिरची घालून मिक्स करून एक वाफ येऊ द्या.
एक प्लास्टिक पेपर वर एका चमचा घेऊन मध्यम आकारच्या पापड्या पसरवून घाला. मग प्लास्टिक पेपर कडकडीत उन्हात ठेवा. संध्याकाळी पापड्या उलट्या करून प्लास्टिक पेपर झाकून ठेवा. परत दुसऱ्या दिवशी कडकडीत उन्हात ठेवा. ह्या पापड्या चांगल्या उन्हात वाळल्यावर मग डब्यात भरून ठेवा.
आपल्याला उपवासाच्या दिवशी किंवा इतर दिवशी सुद्धा तळून खाता येतात.