झणझणीत शेवग्याच्या शेंगाचे पिठले/बेसन : शेवग्याच्या शेंगाचे पिठले हे कधी घरात भाजी नसेल किंवा कधी काही निराळे म्हणून सुद्धा करायला छान आहे. शेवग्यामध्ये रक्तदोष दूर करणारा गुण आहे. वात विकार असणाऱ्यांना शेवगा हा गुणकारी आहे.
पिठले हा पदार्थ महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे. गाव खेड्यात तर पिठले भाकरी अगदी आवर्जून बनवतात. पिठले भाकरीचा बेत असला की त्याबरोबर साजूक तूप, लोणचे, पापड व कच्चा कांदा फोडून घेतात.
मुले शेवग्याच्या शेंगाची भाजी खायचा कंटाळा करतात, त्यासाठी शेवग्याच्या शेगा उकडून त्याचा गर काढून त्यापासून पिठले किंवा बेसन बनवल्यास ते छान चवीस्ट लागते.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी : ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बेसन
३ मोठ्या शेवग्याच्या शेगा
१ मोठा कांदा चिरून
१ छोटा टोमाटो चिरून
१ टे स्पून आले-लसून पेस्ट
३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ टी स्पून हळद
१/४ कप कोथंबीर (चिरून)
मीठ चवीने
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
८-१० कडीपत्ता पाने
कृती: प्रथम शेवग्याच्या शेंगाची साले काढून त्याचे २” चे तुकडे करून घ्या. मग धुवून एका भाड्यात शेंगाचे तुकडे व बुडेल एव्ह्डे पाणी घालून शेंगा शिजवून घ्या. नंतर शेगाचा गर चमच्यानी काढून घ्या. कांदा, टोमाटो व कोथंबीर च्र्रून घ्या. आले-लसून पेस्ट करून घ्या. हिरव्या मिरच्या चिरून घ्या.
एका बाऊलमध्ये बेसन, ४ कप पाणी, लाल मिरची पावडर, हळद, व शेवग्याच्या शेंगाचा गर घालून मिक्स करून घ्या.
एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कडीपत्ता, हिंग घालून मग चिरलेला कांदा, टोमाटो, आले-लसून पेस्ट, हिरवी मिरची घालून थोडे परतून घ्या. मग त्यामध्ये भिजवलेले बेसन व मीठ घालून ढवळून मंद विस्तवावर बेसन ८-१० मिनिट शिजूवून घ्या. मधून मधून ढवळत रहा. बेसन थोडे पातळच राहून द्या अगदी घट्ट शिजवायचे नाही.
गरम गरम बेसन भाता बरोबर किंवा भाकरी बरोबर सर्व्ह करा.