मेक्सिकन व्हेजीटेबल व्हाईट राईस: मेक्सिकन व्हेज राईस मी अगदी सिम्पल पद्धतीने बनवला आहे. मेक्सिकन राईस बनवतांना मी भाज्या वापरून फक्त खडा मसाला फोडणी मध्ये घातला आहे.
मुलांना अश्या प्रकारचा भात आवडतो. तसेच हा भात पौस्टिक सुद्धा आहे. ह्यामध्ये फ्रेंच बीन्स, गाजर, शिमला मिर्च, हिरवा ताजा मटार, व बटाटे उकडून त्याच्या फोडी करून घातल्या आहेत. हा राईस टेबल वर दिसायला उत्कृष्ट दिसतो व चवीला अप्रतीम लागतो. मुलांच्या पार्टीला बनवायला छान आहे.
साधा भात बनवून ह्यामध्ये भाज्या घातल्या आहेत त्यामुळे दिसायला पण छान दिसतो.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
२ कप बासमती तांदूळ
१ मध्यम आकाराचा कांदा (उभा चिरून)
७-८ फ्रेंच बीन्स (उभ्या चिरून)
१ छोटी शिमला मिर्च (उभी चिरून)
१ छोटे गाजर (उभे चिरून)
१/४ कप ताजे मटार दाणे
१ मध्यम आकाराचा बटाटा (उकडून, सोलून,चिरून)
२-३ हिरव्या मिरच्या (चिरून)
मीठ चवीने
फोडणी करीता:
२ टे स्पून तेल
१ तमालपत्र
१०-१२ काळे मिरे
१ टी स्पून शहाजिरे
कृती: प्रथम तांदूळ धुवून त्यामध्ये पाणी, मीठ व १ टी स्पून तूप घालून मोकळा भात शिजवून घ्या. कांदा उभा चिरून घ्या. भाज्या स्वच्छ धुवून उभ्या चिरून घ्या. बटाटा उकडून सोलून, चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या. फ्रेंच बीन्स व मटार अर्धवट शिजवून घ्या.
कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये तमालपत्र, ,मिरे, शहाजिरे घालून उभा चिरलेला कांदा व हिरवी मिरची घालून थोडे गुलाबी रंगावर परतून घ्या मग त्यामध्ये बीन्स, मटार, शिमला मिर्च, गाजर, घालून परतून घेवून उकडलेला बटाटा, मीठ घालून परतून शिजवलेला भात घालून परत चांगले २-३ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
टीप: जर दुपारचा जेवणातील भात राहिला असेल तर तो सुद्धा वापरून अश्या प्रकारचा राईस बनवता येतो.
The Marathi language video of the preparation method of this Mexican Rice Recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=NeJk91otwhM