उपवासाचे आप्पे: उपवासाचे आप्पे ही एक छान खमंग डीश आहे. अश्या प्रकारची डीश बनवतांना वरई चे तांदूळ, उकडलेले बटाटे वापरले आहेत. उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी आपण बनवतो त्या आयवजी आप्पे बनवून बघा. किंवा इतर वेळी सुद्धा आपण नाश्त्याला बनवू शकतो.
बनवण्यासाठी वेळ: ४० मिनिट
वाढणी: २ जणासाठी
साहित्य:
१ कप वरयीचे तांदूळ
२ मोठे उकडलेले बटाटे
३-४ हिरव्या मिरच्या
१ टी स्पून जिरे
१ टी स्पून बेकिंग पावडर
२ टे स्पून दही
१/४ कप तेल
मीठ चवीने
कृती:
वरयीचे तांदूळ निवडून घ्यावे कारण की त्यामध्ये बरेचवेळा गाराचे खडे असतात. मग ते धुवून बुडेल इतपत पाणी घालून २-३ तास भिजत ठेवावे. वरयी भिजली की मिक्सरच्या भांड्यात वरयी, हिरवी मिरची, मीठ, जिरे घालून थोडे जाडसर वाटून घ्या. मिक्सरमध्ये वाटताना अगदी कमी पाणी घाला.
एका मोठ्या आकाराच्या भांड्यात वाटलेली वरयी, उकडून किसलेले बटाटे, मीठ, दही व बेकिंग पावडर घालून मिक्स करून मिश्रण ५ मिनिट झाकून बाजूला ठेवा.
आप्पे पत्राला तेल लाऊन त्यामध्ये मिश्रण घालून बाजूनी तेल सोडून झाकण ठेवा व मध्यम आचेवर ५ मिनिट शिजू द्या मग झाकण काढून आप्पे पलटून घ्या व बाजूनी थोडे तेल सोडून छान खमंग भाऊन घ्या.
गरम गरम उपवासाचे आप्पे दह्या बरोबर सर्व्ह करा.