कुरकुरीत मैद्याचे इन्स्टंट पापड: उन्हाळा आला की महाराष्टातील महिला पूर्ण वर्षाचे वाळवणाचे पदार्थ बनवून ठेवतात. वाळवणाचे पदार्थ म्हणजे पापड, कुरड्या, पापड्या, सांडगे.मैद्याचे पापड हे झटपट होणारे आहेत. चवीला सुद्धा टेस्टी लागतात. मैद्याचा घोळ बनवून त्यामध्ये जिरे, मीठ व पाणी घालून लगेच वाफवून, वाळवून बनवता येतात. हे पापड झटपट बनवता येतात.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: १८ पापड बनतात
साहित्य:
१ कप मैदा
१/४ टी स्पून जिरे
१/२ टी स्पून मीठ
१ टे स्पून तेल
१ कप पाणी
१ छोटे स्टीलचे चहाचे भांडे
४ स्टीलच्या प्लेट भांड्याच्या आकाराच्या
कृती:
एका भांड्यात मैदा घेवून त्यामध्ये मीठ, जिरे घालून हळूहळू पाणी घालून मिश्रण एक सारखे हलवून घ्या. पण गुठळी होता कामा नये.
एका स्टीलच्या भांड्यात २ कप पाणी गरम करायला ठेवा. चार स्टीलच्या प्लेट घेवून चारी स्टीलच्या प्लेटला अगदी थोडेसे तेल लावून त्यावर एक टे स्पून मैदा मिश्रण घालून प्लेट वर पसरवून घ्या.
मग प्लेट गरम भांड्यावर ठेवून त्यावर झाकण ठेवा व दोन मिनिट मैद्याचा पापड वाफवून घ्या. दोन मिनिट झाले की भांड्यावरची प्लेट खाली उतरून लगेच दुसरी प्लेट भांड्यावर ठेवा असे आपल्याला मिश्रण संपे परंत करायचे आहे. भांड्यातील पाणी संपत आले की अजून पाणी घालायचे.
पापड बनवून झालेकी प्लास्टिकच्या पेपरवर वाळत ठेवून कडकडीत उन्हात वाळत घाला. वाळलेकी तळून खा.