चार ४ प्रकारच्या मऊ लुसलुशीत घडीच्या चपात्या किंवा पोळ्या ह्याचे गुपित. गव्हाच्या पीठाची चपाती म्हंटले की आपल्याला जेवणात पाहिजेच त्या शिवाय आपले जेवण होत नाही. जेवणात चपाती छान मऊ असेल तर मन अगदी तृप्त होते.
गहू मधील आपण गुणधर्म बघू या. गहू हा मधुर, थंड, वायू व पिक्तनाशक, पचावयास जड, बलकारक, पुष्टी कारक, रुची निर्माण करणारा आहे.
गव्हाच्या पिठाच्या चपात्या आपण विविध प्रकारांनी बनवू शकतो त्याच्या चार प्रकार मी दिले आहेत. गव्हाचे पीठ मळताना नेहमी तेलाचा वापर करावा मग चपाती पचायला हलकी होते. तसेच लाटताना तांदळाच्या पिठीवर लाटली तर हलकी होते. लाटताना एक सारखी लाटा कडा जाड न ठेवता पातळ लाटाव्या. चापाती भाजून झाल्यावर वरतून थोडेसे तेल किंवा साजूक तूप लावावे. म्हणजे चपाती छान मऊ राहते.
बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ७-८ बनतात
साहित्य:
२ कप गव्हाचे पीठ
१ टे स्पून तेल
मीठ चवीने
दुध व पाणी आवश्यक तेव्हडे
तेल चपातीला लावायला
तांदळाची पिठी किंवा गव्हाचे पीठ वरतून लावायला
साजूक तूप किंवा तेल वरतून लावायला
कृती: कणिक मळताना: एका परातीत गव्हाचे पीठ, मीठ व थोडे तेल घालून मिक्स करून घ्या. एका भांड्यात दुध व पाणी मिक्स करून घ्या. (दुध आपल्याला हवे असेलतर घाला) मग कणिक सैलसर मळून घ्या (कणिक मळताना फार घट्ट किंवा फार पातळ मळू नये) पीठ मळून झाल्यावर तेलाचा हात लाऊन अर्धा तास झाकून बाजूला ठेवा म्हणजे आपल्या पोळ्या चांगल्या होतील. ( कणिक मळताना एकदम पाणी घालू नका हळूहळू थोडे थोडे पाणी घालत कणिक मळून घ्या.) मग एक सारखे गोळे बनवून घ्या.
पहिला प्रकार: एक पिठाचा गोळा घेऊन पुरी सारखा लाटा बोटानी पुरीच्या कडेला दाबून म्हणजे एका टोका पासून दुसऱ्या टोका परंत दाबून दोनी टोके जुळवून घ्या मग दोनी भागांना तेल लावून पीठ भुरभुरून एक भाग दुसऱ्या भागावर ठेवून गोल आकार देवून पोळी लाटून दोन्ही बाजूनी भाजून घ्या. पोळी भाजून झाल्यावर त्यावर तेल किंवा साजूक तूप लावावे.
दुसरा प्रकार: एक पिठाचा गोळा घेवून पुरी सारखा लाटून घ्या. त्यावर तेल लावून पीठ भुरभुरून एकदा मुडपून घ्या मग परत एकदा मुडपून घ्या म्हणजे त्रिकोणी आकार होईल. त्याला हातानी गोलाकार आकार देवून लाटून भाजून घ्या.
तिसरा प्रकार: एक पिठाचा गोळा घेवून पुरी सारखा लाटून घ्या. त्यावर तेल लावून पीठ भुरभुरून मध्य भागापासून टोका परंत सुरीने एक चीर द्या. (फक्त अर्धी चीर) मग ती ५-६ वेळा गोलाकार मुडपून घ्या म्हणजे त्रिकोणी आकार होईल. त्याला हातानी गोलाकार आकार देवून लाटून भाजून घ्या.
चौथा प्रकार: एक पिठाचा गोळा घेवून पुरी सारखा लाटून घ्या. त्यावर तेल लावून पीठ भुरभुरून आपल्याला वळकटी सारखा करून म्हणजे एक रोल सारखे बनवून मुडपून गोलाकार आकार देवून लाटून भाजून घ्या. पोळी भाजल्यावर वरतून तेल किंवा तूप लावा.
आपल्याला चारी प्रकारा पैकी एक प्रकार घेवून सर्व पोळ्या बनवून भाजून वरतून तेल अथवा तूप लावून स्टीलच्या डब्यात किंवा केस रोल मध्ये किंवा टिफीन मध्ये ठेवा. मस्त मऊ रहातात.
The Marathi language video of this recipe for Making 4 Different Kinds of Folded Chapati or Poli can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=fZCNPcMAj6w