टेस्टी चटपटीत पौस्टिक मिश्र डाळीचे चीज आप्पे: मिश्र डाळींचे आप्पे बनवतांना चणाडाळ, उडीदडाळ, मसूरडाळ, तुरडाळ मुगडाळ व तांदूळ वापरले आहेत. डाळींमध्ये अनेक पौस्टिक गुणधर्म आहे. त्याचे रोज सेवन करावे. डाळींमध्ये फायबर आहे त्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते तसेच कॅल्शियम आणि प्रोटीन पण जास्त प्रमाणात आहे. आयरन Iron आहे त्यामुळे ताकद मिळते पचनशक्ती सुधारते. व्हिटॅमिन बी1, मिनरल्स, पोटॅशियम, आयरन आणि लो कोलेस्ट्रॉल आहे. फॉलिक अॅसिड, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम आहे गरोदर स्त्रीयांसाठी ही डाळ फायदेशीर आहे.
टेस्टी चटपटीत पौस्टिक मिश्र डाळीचे चीज आप्पे आपण नाश्त्याला किंवा संध्याकाळी चहा बरोबर सर्व्ह करण्यासाठी सुद्धा बनवू शकतो किंवा मुलांना शाळेत जातांना डब्यासाठी सुद्धा मस्त आहेत. अश्या प्रकारचे आप्पे बनवतांना सर्व डाळी वापरून त्यामध्ये चीज वापरले आहे. त्यामुळे मुलांना डब्बा पटकन संपू शकतो. चला तर मग आपण आप्पे कसे बनवायचे ते बघू या.
बनवण्यसाठी वेळ: ३० मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१/२ कप तांदूळ
१/४ कप चणाडाळ
१/४ कप उडीदडाळ
१/४ कप मसूरडाळ
१/४ कप मुगडाळ
१/४ तुरडाळ
१ टे स्पून इडली रवा
मीठ चवीने
तेल चीज आप्पे फ्राय करण्यासाठी
मसाला करीता:
१ छोटा कांदा (बारीक चिरून)
१ टे स्पून आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट
२ टे स्पून कोथंबीर (चिरून)
२ टे स्पून ओला नारळ (खोवून)
१ चीज क्यूब (किसून)
फोडणी करीता:
१ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ टी स्पून हिंग
१/४ टी स्पून हळद
७-८ कडीपत्ता पाने (चिरून)
कृती: प्रथम सर्व डाळी धुवून ७-८ तास पाणी घालून भिजत ठेवा. तांदूळ धुवून भिजत ठेवा. मग डाळी व तांदूळ मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्या. मिश्रण फार पातळ नको थोडे घट्टसर पाहिजे. एका भांड्यात मिश्रण काढून त्यामध्ये इडलीचा रवा घालून मिक्स करून ७-८ तास तसेच झाकून बाजूला ठेवा. मग ते चांगले फुगून येईल.
कांदा व कोथंबीर बारीक चिरून घ्या. आले-लसून-हिरवी मिरचीची पेस्ट करून घ्या. चीज किसून घ्या. नारळ खोवून घ्या.
फोडणीच्या कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद, कडीपत्ता पाने घालून खमंग फोडणी तयार करून वाटलेल्या मिश्रणात घाला. मिश्रणात चिरलेला कांदा, कोथंबीर, ओला खोवलेला नारळ, मीठ, चीज घालून छान एकत्र करून घ्या.
आप्पे पात्र विस्तवावर गरम करायला ठेवा त्याला तेल लावून घ्या व आप्पे पात्रामध्ये एक एक मोठा चमचा मिश्रण घाला बाजूनी थोडे तेल सोडून झाकण ठेवा विस्तव मध्यम आचेवर ठेवून पाच मिनिट आप्पे तसेच ठेवा मग उलट करून परत थोडसे बाजूनी तेल सोडा. दोन्ही बाजूनी आप्पे चांगले खरपूस भाजून झाले की प्लेटमध्ये काढून घ्या.
गरम गरम टेस्टी चटपटीत पौस्टिक मिश्र डाळीचे चीज आप्पे टोमाटो सॉस किंवा पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Cheese Appe recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=a-k_oNR4LLA