खमंग सोपा व झटपट मेथी पालक पराठा रोल रेसिपी – मेथीची भाजी खाण्याचे फायदे आपण ह्या आगोदर पाहिले आहेत. मेथीच्या सेवनानी आपले वजन कमी होऊ शकते. आपली त्वचेचे आरोग्य चांगले रहाते. केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. मेथी मध्ये आयर्न, कैल्शियम, फास्फोरस, प्रोटीन व विटामिन K आहे. ज्यांना डायबेटीस आहे त्याच्यासाठी मेथीचे सेवन करणे हितावह आहे.
पालकची भाजी खाणे हे आपल्या शरीरासाठी फायदेमंद आहे. पालक मध्ये मिनरल्स, विटामिन “C”, न्यूट्रीएंट्स भरपूर प्रमाणात आहेत. पालक हा सुपर-फूड आहे असे म्हणायला हरकत नाही. पालक ह्या भाजी मध्ये हिमोग्लोबिन वाढण्याचे गुण आहेत. गर्भवती महिलामध्ये फोलिक एसिडची नेहमी कमतरता असते ते पालक खाण्यामुळे फायदेशीर ठरते. आपली रोग प्रतिकार शक्ती वाढते.
पालक मेथी पराठा बनवण्यासाठी पालक व मेथी धुऊन बारीक चिरून घेतली आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट, बेसन, गव्हाचे पीठ, धने-जिरे पावडर वापरले आहे मुलांना शाळेत जातांना डब्यासाठी छान आहे.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य:
१ कप पालक पाने (बारीक चिरून)
१ कप मेथी पाने (बारीक चिरून)
२ कप गव्हाचे पीठ
२ टे स्पून बेसन
१ टे स्पून आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/४ टी स्पून हळद
१/४ टी स्पून हिंग
१ टी स्पून धने-जिरे पावडर
मीठ चवीने
तेल रोल भाजण्यासाठी
तूप वरतून लावण्यासाठी
कृती: प्रथम मेथी व पालक धुऊन बारीक चिरून घेतला. आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट बनवून घ्या.
एका मोठ्या आकाराच्या बाउलमध्ये गव्हाचे पीठ, बेसन, चिरलेली मेथी, पालक, आले-लसून-हिरवी मिरची पेस्ट, धने-जिरे पावडर, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, मीठ घालून मिक्स करून घ्या मग त्यामध्ये पाणी घालून घट्ट पीठ मळून घेवून १५ – २० मिनिट झाकून बाजूला ठेवा. मळलेल्या पीठाचे एक सारखे ८ गोळे बनवून घ्या.
तवा विस्तवावर गरम करायला ठेवा. पोलपाटावर एक गोळा घेवून लाटून तव्यावर छान तेल सोडून दोनी बाजूनी खमंग भाजून घ्या. अश्या प्रकारे सर्व पराठे बनवून भाजून घ्या.
गरम गरम मेथी पालक पराठा रोल तूप घालून टोमाटो सॉस बरोबर सर्व्ह करा.
The Marathi language video of this Fenugreek Spinach Paratha Recipe can be seen on our YouTube Channel – https://www.youtube.com/watch?v=DO5kvZUuLGI